जादा परताव्याचे आमिष देत अनेकांची कोट्यवधीत फसवणूक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कंपनी स्थापन करून ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी यासाठी जास्त परतावा, भेटवस्तू व आकर्षक बक्षिसांचे आमिष देवून अनेकांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी  फसवणूक करणार्‍याला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

राजकुमार नारायण पाटील (रा. कोल्हे हिल्स परिसर, जळगाव), जितेंद्र बाबूराव सोनवणे (रा. डी.डी. नगर, एन.एस. हायस्कूलच्या पुढे, पारोळा) आणि हिरालाल दौलत पाटील (रा. १५५, प्रभातनगर, बिलाडीरोड, देवपूर, धुळे) यांनी मिळून इ ऍन यू (एज्युकेशन फॉर यू सेल्स ऍण्ड सर्व्हिसेस ) या नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत ठेवीदारांना मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी जास्त परतावा, भेटवस्तू व आकर्षक बक्षिसांचे आमिष दाखवले. तसेच यासाठी मल्टी लेव्हल मार्केटींगची अट टाकण्यात आली होती.

या आमिषांना बळी पडून ठेवीदारांनी अनेक लोकांकडून पैसे घेतले, मात्र त्यांना कोणतीही पावती देण्यात आली नाही. दरम्यान फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर ठेवीदारांनी पैशांसाठी तगादा लावला. यामुळे या तिघांनी कंपनी बंद करून इंटरनेटवरून संपूर्ण माहिती डिलीट केली. तसेच धुळे शहरात सुमारे ३६ लाख रुपयांची फसवणूक त्यांनी केली होती. याप्रकरणी वर्षभरापूर्वी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर हा गुन्हा तपासासाठी धुळे आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य संशयित राजकुमार नारायण पाटील हा फरार झाला होता. त्याच्या वास्तव्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या अनुषंगाने पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देव्हडे, लक्ष्मण पाटील, किशोर राठोड, रणजित जाधव, विनोद पाटील, ईश्वर पाटील यांच्या पथकाने सापळा रचून जिल्हा परिषद परिसरातून राजकुमार याला ताब्यात घेतले.

यानंतर त्याला धुळे पोलिसांकडे दिले आहे. या घोटाळ्यात कोट्यवधी रूपयांची फसवणूक झाल्याची प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे. तसेच राजकुमार पाटील याच्या अटकेमुळे आता उर्वरित दोन्ही संशयित देखील ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.