कृपाकटाक्षें सांभाळी दीना I तुजविण रामा मज कंठवेना II

0

करुणाष्टक 33

संसारसंगे बहु पीडलो रे I

कारुण्यसिंधू मज सोडवीं रे II

कृपाकटाक्षें सांभाळी दीना I 

तुजविण रामा मज कंठवेना II

 

प्रत्येक मनुष्यमात्रास त्रिविध ताप भोगावे लागतात. हे ताप तीन प्रकारचे आहेत. अध्यात्मिक हा पहिला प्रकार आहे. देहामधून जे येते व इंद्रिय, प्राण यांच्या योगाने जे  दुःख होते त्यास अध्यात्मिक ताप म्हणतात. खरुज, पुळपा, नारू, नखुरडे, देवी, गोवर होणे, केसतोडा, गालफुगी, खाज सुटणे, हिरडी सुजणे, अंगावर फोड येणे, शरीर सुजणे, वात शिरून कळा लागणे, गजकर्ण, गुडघ्यातील वाटी सरकणे, कंबर, पाठ, मान, हाडाचे दुखणे, सर्दी, कफ, दमा, पोट फुगणे, उसण, घास लागणे, घटसर्प, कानाचे रोग, डोळ्याचे रोग, मोतीबिंदू, नाना प्रकारच्या काळजीने कळा पडणे, अनेकाविध दुःखाने चित्त होरपळणे, व्याधी नसताना तळमळणे, म्हातारपणाचे हाल, देह नित अशक्त असणे अशा या शरीराच्या व मनाच्या मिळून ज्या व्याधी असतात त्यांना अध्यात्मिक ताप म्हणतात. पूर्वपातकांचे फळ म्हणून हा थोडाफार भोगावाच लागतो.

आता आधिभौतिक तापात पिसाळ, ढेकूण, भुंगा, गोचीड, मधमाशी चावणे, गोम, विषारी साप चावणे अशा अनेक प्रकारच्या क्रूर प्राण्यांपासून ताप होणे, कोणी शाप देणे, कोण भ्रष्ट होणे, झाडावरून खाली पडणे, सासुरवास, ठोसे मारणे, डागणे, चिमटे घेणे, रोग बरा होण्यासाठी कडक पथ्याचे औषध घेणे, दरोडे घालून चोर माणसांना छळतो, या योगाने दुःख होते त्यास आधिभौतिक असे म्हणतात. लहानपणी आई मरणे, तारुण्यात बायको जाणे हे सारे आधिभौतिक ताप आहेत.  प्राणांना आपापल्या बऱ्या-वाईट कर्मामुळे देहाच्या स्वर्ग किंवा नरक यातना भोगाव्या लागतात त्याचे नाव अधिभौतिक ताप हे होय. नितीन्याय  सोडल्यास यमयातना भोगाव्या लागतात. यमदंड व यमयातना तो भोग कधीही कुणाला टळत नाही याचे नाव आधिभौतिक.

जे वेदाच्या आज्ञेप्रमाणे चालत नाहीत व हरीभक्त ते करत नाहीत त्यांना यमयातना भोगाव्या लागतात. हा ताप फार मोठा असतो. असा संसारातल्या त्रिविध तापाने जो पोळलेला असतो तोच परमार्थ करण्यास अधिकारी ठरतो. कारण त्याची स्वतःची प्रचिती असते की या संसारात सुखापेक्षा दुःख अधिक आहे. संसारचित्राच स्वरूप पाहता ते कुणाही सुज्ञाला अंतर्मुख करायला लावणारे आहे. म्हणूनच या संसाराच्या सहवासात मी खुप त्रस्त आहे, पीडलो आहे, गांजलो आहे आणि असे वाटणे स्वाभाविक आहे.  समर्थ ही वर्णन करतात “संसारसंगे बहु पीडलो रे” मी खुपच शिणलोय, मला सार्‍याचा उबग आलाय. म्हणून हे करुणासागरा, दयासागरा, कृपासागरा, रामराया मला यातून सोडव. कृपा कर, कृपादृष्टीने माझा दीनाचा सांभाळ कर. हे दयाळा, त्रैलोक्यपाळा तुझा जय असो. जन्माला येऊन आपण काय काय केले याचा आढावा घेतला तर पुढच्या जन्माची आपण तयारीच करून ठेवतो. आपली साधना होते की नाही ? आपले काम, क्रोध, लोभ कमी होतात की नाही ? याकडे लक्ष द्यायला आपल्याला सवडच कुठे असते.

आपले मन थोडे तरी त्यागी झाले का ? विरागी झाले का ? अशी परिक्षा आपली आपणास घ्यावयास हवी. आपली भावभक्ती, प्रेम, श्रद्धा दिवसेंदिवस वाढत आहे की ती कमी होत आहे ? प्राणीमात्रांविषयी प्रेम वाटते का निष्प्रेम व कठोर आपण बनतोय ? संत तुकाराम महाराज म्हणतात, “आता दिवस चारी खेळीमेळी” असा भाव व्हायला हवा. “याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा” व हा शेवटचा दिवस गोड करण्यासाठी प्रथम पासुन प्रयत्न करावा लागतो. मेरिट लिस्टमध्ये येणारा विद्यार्थी जून महिन्याची शाळा सुरू व्हायची वाट पाहत नाही.  एप्रिल मध्येच अभ्यासास सुरुवात करतो. तसंच इथं ही घाई गडबड चालत नाही. नाम, ध्यान, पुजा, सदग्रंथ वाचन सप्रेमानं वर्षानुवर्षे व्हायला लागतं. हे जर जिकरिने व जिद्दीने घडलं तरच आपल्याला त्या ‘कृपासिंधू’ प्रभूला हक्काने हाक मारण्याचा अधिकार प्राप्त होतो. मी यथाशक्ती यथा  बुद्धी प्रयत्न केला.

आता मात्र मी शिणलोय. धावत ये मला भवसागरातून पैलपार उतरवण्यास मदत कर आणि तो येतो ही कारण त्याच ब्रीद आहे “कल्पनेची बाधा न हो कोणेकाळी ही संत मंडळी सुखी असो” भक्तांच्या, साधकांच्या सुखासाठी सेवेसाठी तो ‘रघुराया” तत्पर असतो. तो सर्वशक्तिमान, सामर्थ्यवान असल्याने या दिनाचा तो सांभाळही  करतो. ‘सांभाळ’ या शब्दानं प्रेमासह  काळजी घेणे. आत्मीयता व ममत्वाने, जिव्हाळा व आपुलकीने आपलेसे करणं आपलं म्हणणं हे अभिप्रेत असतं. आई आपल्या मुलाला सांभाळते ते किती प्रेमाने, मायेने तिला त्यात कष्टही वाटत नाही. गुणवान मुलं आपल्या वृद्ध माता-पित्यांना सांभाळतात, कर्तव्यबुद्धीने नाही तर प्रेम भावासह. समर्थ ही इथे रामरायाला म्हणतात, “कृपाकटाक्षे  सांभाळी दिना” आमचा भाव, बोध तु दिवसेंदिवस वृद्धिंगत कर.”उपजला भावो तुझे कृपे सिद्धी जावो”  तो भाव तुझ्या चरण कमलाशी स्थिर राहो. आम्ही तुझे दास भक्त आहोत. तुझ्या कृपाकटाक्षाने आम्ही निरंतर सुखी असू. कासवी जसे आपली पिल्ले कृपेने पोषिती, तसे भगवंता तुझ्या कृपेने आम्हाला ‘आत्मज्ञानाचा’ लाभ होईल. अनंतयुगीचा  ‘आत्माराम’ आम्हाला भेटेल. तुझ्या कृपे शिवाय आमची प्रगती शक्य नाही. रामराया तू आमचे जीवन आहे. तुझ्याशिवाय क्षणभरही आम्ही राहु शकत नाही.

II जय जय रघुवीर समर्थ II

लेखिका -भाग्यरेखा पाटोळे 

    कोथरूड,पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.