राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निवडणुकीवर खल

रावेरसाठी चौघे इच्छुक : खडसेंची लढण्याची इच्छा पण...

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ची आज जिल्हा बैठक पार पडली. या बैठकीत रावेर लोकसभा मतदार संघासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. पक्षाकडे एकनाथराव खडसे यांच्यासह चौघे इच्छुक असून त्यासंदर्भात लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली. यावेळी एकनाथराव खडसे यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले.

काल दुपारी राष्ट्रवादी कार्यालयात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, ॲड. रोहिणी खडसे, माजी आमदार अरुण पाटील, अतुल पाटील, रमेश पाटील उपस्थित होते.

खडसे यांनी यावेळी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसला रावेरची जागा सुटली असून ती पूर्ण ताकदीने लढविली जाणार आहे. पक्षाकडे एकनाथराव खडसे, अतुल पाटील, ॲड. रवींद्र पाटील, प्रा. एस.एस. राणे, रमेश पाटील यांच्यासह एक ठेकेदारही इच्छुक आहे. स्वत: खडसे यांनी आपल्या उमेदवारीबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने निर्णय घेणार असल्याचे सांगितले.

रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार असून भाजपाला शह देणार आहे. जळगावची जागा शिवसेना (उबाठा) गटाला सोडली असून त्यांचाही उमेदवार लवकरच जाहीर होर्इल असेही खडसे म्हणाले.

‘त्यांच्या’ परवानगीची आवश्यकता नाही !

मी भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा सुरु आहे. माझ्या प्रवेशाला स्थानिक नेते खोडा घालत आहेत हे पूर्णत: खोटे आहे. माझे भाजप श्रेष्ठींशी व्यक्तिगत संबंध आहेत. स्थानिक नेत्यांच्या परवानगीची मला आवश्यकता नाही असे  खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.