सरकारने आजचे मरण उद्यावर ढकलले; खडसेंची अध्यादेशावर शंका

.. तर सर्व कष्टांवर पाणी फिरणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात होणाऱ्या मराठा आरक्षणाला अखेर न्याय मिळाला आहे.  सरकारच्या वतीने मराठा आंदोलकांची सगेसोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतची मागणी मान्य करून त्याच्या अधिसूचना काढली. याचा मराठा समाजातील सुमारे दोन कोटी 80 लाख लोकांना फायदा होणार असल्याचे जरांगेंनी स्पष्ट केले. आता यावर अनेक जण आपले मत व्यक्त करीत आहेत. सरकारच्या या निर्णयाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  एकनाथ खडसेंनी संशय व्यक्त केला आहे.

काय म्हणाले खडसे ?

नोंदी सापडलेल्या मराठ्यांच्या सगेसोयऱ्यांनाही सशर्त आरक्षण मिळेल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. सरकारचा हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर किती टिकेल, अशी शंका खडसेंनी व्यक्त केली. ही अधिसूचना काढून सरकारने फक्त आजचे मरण उद्यावर ढकलले आहे.

मराठ्यांना अडचणी येतील

एकनाथ खडसे म्हणाले, ‘मराठा आंदोलकांच्या मागण्यांबाबत तातडीने अधिसूचना काढून, सरकारने आजचे मरण उद्यावर ढकलले आहे. आता हा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकला पाहिजे. मात्र कायद्याच्या कसोटीवर तो कितपत टिकेल, अशीही शंका आहे. सगेसोयरे रक्ताच्या नात्यात येत नाही. त्यामुळे वंशावळ दाखवताना मराठ्यांना अडचणी येतील. हे स्पष्ट असतानाही सरकार सगेसोयऱ्यांसह इतर मागण्यांवर रात्रीत अधिसूचना काढते, हे संशयास्पद आहे. अधिसूचनांच्या माध्यमातून सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत तर नाही ना,’ अशी शंका खडसेंनी व्यक्त केली.

सरकारवर प्रचंड दबाव 

तसेच आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाजाचा सरकारवर प्रचंड दबाव होता. या दबावापुढे सरकारने नमते घेत सध्या यशस्वीरीत्याआंदोलन सोडवले आहे. मात्र उद्या आरक्षणाबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तर मराठा समाज सरकारला माफ करणार नाही. सध्या सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबाबत क्युरेटिव्ही पिटीशन आहे. या पिटीशनच्या निर्णयानंतर आजचा निर्णय झाला असता, तर तर तो कायद्याच्या निकषांमध्ये बसवून घेतल्यासारखे वाटले असते. भविष्यात जर क्युरेटिव्ह पिटीशनचा निर्णय आणि अधिसूचनांमध्ये विसंगती आल्या तर आतापर्यंत घेतलेल्या सर्व कष्टांवर पाणी फिरणार आहे,’ असे देखील खडसे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.