राष्ट्रवादीचे संतोष चौधरी बंडाच्या पवित्र्यात…!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला सुटला. रावेरचे उद्योगपती श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. उद्योगपती श्रीराम पाटील हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली, परंतु रावेर लोकसभेसाठी इच्छुक असलेले भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये श्रीराम पाटलांच्या उमेदवारीमुळे असंतोष पसरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संतोष चौधरी यांना उमेदवारी देण्याबाबत सकारात्मकता दर्शवली होती, असे संतोष चौधरी समर्थकांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कार्यकर्त्याला रावेर लोकसभेची उमेदवारी देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय केला, असा आरोप संतोष चौधरी समर्थक करीत आहेत. वरणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी आणि वरणगाव शहराध्यक्ष समाधान जगदेव चौधरी यांनी आपल्या पदाचे राजीनामे प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवून आपला असंतोष प्रकट केला आहे. त्यांनी जयंत पाटलांना लिहिलेल्या पत्रात ‘निष्ठावंतांवर अन्याय करून तीन वेळा पक्ष बदलणाऱ्या श्रीराम पाटलांना उमेदवारी दिल्याच्या निषेधार्थ राजीनामा दिल्याचे’ म्हटले आहे. उद्योगपती श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (शरद पवार) नाराजी पसरली होती. विशेषतः भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांना उमेदवारी देण्यात संदर्भात शरद पवारांनी सकारात्मकता दर्शवल्याचे सांगून भुसावळ मध्ये जणू ‘अधिकृत उमेदवारी मिळाली’ या अविर्भावात संतोष चौधरींच्या समर्थक आणि त्यांचे लहान बंधू अनिल चौधरी यांनी जल्लोष केला होता. संतोष चौधरींना मोठ्या फरकाने रावेर लोकसभा मतदारसंघातून विजयी करू, असेही जाहीर केले होते. परंतु त्यानंतर दहा ते बारा दिवस रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला नव्हता. अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नव्हती. दरम्यान निवडून येणारा उमेदवार आणि विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना टक्कर देऊ शकणाऱ्या उमेदवाराच्या शोधात राष्ट्रवादी काँग्रेस होती. भाजपचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनाही गळाला लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातर्फे करण्यात आल्याचे सांगण्यात येते. तथापि त्याला यश आले नाही. त्यानंतर शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते एडवोकेट रवींद्र भैय्या पाटील यांचे नावावरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात होती. दरम्यान उद्योगपती श्रीराम पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. दोन-तीन दिवस शरद पवार जयंत पाटील यांच्याशी त्यांची प्रदीर्घ चर्चा झाली. अखेर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे आता रक्षाकडे असे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत रंगणार आहे.

 

निवडून येणाऱ्या उमेदवाराच्या निकषात सर्वाधिक प्रशंसा श्रीराम पाटलांनी मिळवली असल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून श्रीराम पाटलांनी उमेदवारी अधिकृतपणे जाहीर केल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. त्यामुळे सहाजिकच इच्छुक असलेले नेते नाराज झाले. विशेषतः माजी आमदार संतोष चौधरी आणि त्यांच्या समर्थकांचा त्यात समावेश आहे. परंतु पक्ष श्रेष्ठींचा निर्णय मान्य करून अधिकृत पक्षाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला पाहिजे. तथापि संतोष चौधरी बंडाच्या पवित्रात असून अपक्ष उमेदवारी लढवण्यासाठी येत्या १५ एप्रिलला कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वातंत्र्य असते, परंतु लोकसभेची निवडणूक अपक्ष लढवणे सोपी गोष्ट नव्हे. एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचे क्षेत्र असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढविणे सोपे नाही. विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची मोठी अडचण होते. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून उमेदवारी लढविणाऱ्या संतोष चौधरींचे लहान बंधू अनिल चौधरींना याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे असंतोष प्रकट करणे, आपल्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविणे यासाठी बंडाची भाषा करणे ठीक आहे. संतोष चौधरी यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शक्ती प्रदर्शन जरूर करावे, परंतु अपक्ष निवडणूक लढवावी सोपे नाही, एवढे मात्र निश्चित…!

Leave A Reply

Your email address will not be published.