खान्देशातील चारही जागांवर भाजप तर्फे नवे चेहरे..?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

दोन-चार दिवसात लोकसभा निवडणुकीची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून आचारसंहिता लागू होईल. भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून दुसरी यादी एक-दोन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यात महाराष्ट्रातील भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर होईल. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी भाजपतर्फे किमान ३४ जागांवर उमेदवार देण्याचा आग्रह आहे. त्यामुळे महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सिंगल आकडी संख्येवरच समाधान मानावे लागणार आहे. शिंदे यांच्या शिवसेनेकडे विद्यमान १३ खासदारांपैकी अनेकांना उमेदवारी मिळणार नसल्याने शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तीन ते चार जागा देऊन बोळवण केली जाणार आहे. त्यापैकी १२ मतदारसंघ अजित पवारांच्या काँग्रेसला देऊन शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फूट भाजपच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तसेच महाराष्ट्रातील भाजपचे विद्यमान खासदारांपैकी १३ खासदारांचे तिकीट कापून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार अनुक्रमे उन्मेष पाटील आणि रक्षा खडसे या दोघांचेही तिकीट कापून तेथे नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

 

जळगाव लोकसभा मतदारसंघात खासदार उमेश पाटील यांच्या जागी माजी आमदार स्मिता वाघ यांचे नाव आघाडीवर असून २०१९ च्या निवडणुकीच्या वेळी स्मिता वाघ यांना दिलेले अधिकृत उमेदवारी ऐनवेळी रद्द करून खासदार उन्मेष पाटलांना तिकीट दिले होते. त्यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ आणि स्मिता वाघ यांची एक कमालीची नाराजी पसरली होती. तसेच स्मिता वाघ यांच्या प्रचारालाही सुरुवात झाली होती. परंतु पक्षाचा आदेश मान्य करून खासदार उन्मेष पाटलांच्या प्रचारात हे दोघी पती-पत्नी सामील झाले होते. त्यामुळे त्यावेळची भरपाई पक्षातर्फे भरून काढण्यासाठी स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. इच्छुकांमध्ये अविनाश पाटील, रोहित निकम, दिलीप रामू पाटील यांच्या नावांची सुद्धा चर्चा आहे. रावेर लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार रक्षा खडसेंचे तिकीट कापून तिथे माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल जावळे यांचे नाव आघाडीवर आहे. अमोल जावळे हे भाजपचे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते असून सध्या त्यांच्याकडे रावेर लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाध्यक्ष पदही आहे. त्यांच्यानंतर दुसरे नाव चर्चेत आघाडीवर आहे, ते म्हणजे डॉ. कुंदन फेगडे यांचे. डॉ. कुंदन फेगडे हे सुद्धा भाजपचे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते असून वैद्यकीय सेवेमुळे ते चांगले परिचित आहेत. इच्छुकांमध्ये उद्योगपती श्रीराम पाटील आणि डॉ. केतकी पाटील यांच्या नावांची चर्चा आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघात सुद्धा नवीन चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

 

खान्देशातील धुळे लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विजयी झालेले असून ते माजी केंद्रीय राज्यमंत्री सुद्धा होते. तथापि त्यांचे तिकीट कापून त्यासाठी त्या ठिकाणी गुजरात राज्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष मूळ महाराष्ट्राचे रहिवासी डॉ. सी आर पाटील यांच्या कन्या सौ. धरती देवरे यांचे नाव आघाडीवर आहे. सौ. धरती देवरे या धुळे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्ष असून राजकारणाचा त्यांना अनुभव आहे. तसेच सी आर पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विश्वासू असल्याने धरती देवरे यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर खान्देशातील नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार डॉ. हिना गावित यांचेही तिकीट कापले जाण्याची चर्चा असून त्यांच्या जागी त्यांचे वडील महाराष्ट्रातील महाराष्ट्राचे मंत्रिमंडळातील आदिवासी विकास मंत्री डॉ. विजय गावित यांना तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खान्देशातील चारही खासदारांना भाजप यंदा घरी बसवणार या चर्चेने सर्वत्र खळबळ उडाले आहे. पाहूया खान्देशातील किती खासदारांची तिकीट कापून नव्या चेहेरांना संधी देण्यात येते. एक-दोन दिवसात याचा फैसला होईल…!

Leave A Reply

Your email address will not be published.