खडसेंच्या घरवापसीला महाराष्ट्रातून विरोध?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

“भाजप हे माझे घर आहे. मी माझ्या घरात पुन्हा जाणार आहे”, असे म्हणणारे आमदार एकनाथ खडसे यांची घरवापसी रखडण्याचे कारण काय? दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा जेव्हा भाजपात प्रवेश होतो तेव्हा भाजपवाले त्यांचे समर्थन करून जोरदार स्वागत करता. परंतु ‘भाजप पक्षामध्ये माझी घर वापसी होतेय’, असे म्हणणारे एकनाथ खडसेंचे भाजपच्या नेत्यांकडून पाहिजे तसे स्वागत होत नाहीये. उलट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे संकट मोचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी ज्या पद्धतीने सावध आणि खोचक प्रतिक्रिया दिली आहे. हे पाहता खडसेंच्या घरवापसी विषयी ही भाजपची महाराष्ट्रातील नेते मंडळी विशेष उत्सुक असल्याचे दिसून येत नाही. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणतात, “एकनाथ खडसे यांची एकट्याची घरवापसी म्हणजे हा तुटक तुटक प्रवेश म्हणावा लागेल.” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, “एकनाथ खडसे यांच्या घरवापसी बद्दल अद्याप भाजपकडून अधिकृतपणे काही जाहीर केलेले नाही. त्यामुळे याबद्दल आत्ताच बोलणे योग्य होणार नाही.” ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणतात, “एकनाथ खडसे यांची थेट दिल्लीशी हॉट लाईन आहे. त्यामुळे त्यांची घरवापसी केव्हा होणार हे मला सांगता येणार नाही.” या तिन्ही प्रतिक्रियांपैकी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची प्रतिक्रिया थोडी मावळ असल्याचे कारण म्हणजे, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांच्या प्रमाणे बावनकुळेंचेही तिकीट कापले गेले होते. तथापि बावनकुळे यांनी भाजप बरोबर विशेषतः देवेंद्र फडणवीसांबरोबर जमवून घेऊन भाजपात पुन्हा आमदारकी तसेच प्रदेशाध्यक्ष पद पटकवले. देवेंद्र फडणवीस तसेच गिरीश महाजन हे दोन्ही नेते म्हणजे एकनाथ खडसे यांचे कट्टर शत्रू होत. या दोघांच्या सावध आणि खोचक प्रतिक्रिया पाहता खडसेंच्या घरबाबतीला त्यांचा विरोध आहे. परंतु जर पक्षश्रेष्ठींनी लोकसभेच्या महाराष्ट्रातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खडसेंची घरवापसी केली, तर नाईलाजाने हे नेते ते मान्य करतील. परंतु ‘भाजपमध्ये त्यांचा कितपत सन्मान होईल’ हे मात्र सांगता येणार नाही. या सर्व बाबी लक्षात घेता, एकनाथ खडसे यांची घरवापसी काही अटींवर होणार असल्याचेही बोलले जातेय. सध्या तरी एकनाथ खडसे हे घरवापसीच्या संदर्भात म्हणजे घरवापसी केव्हा होईल? यासंदर्भात मौन बाळगून आहेत. दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसे यांचे फोटो झळकत आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे हे भाजपच्या विरोधात प्रचार करणार नाहीत, एवढे मात्र निश्चित..

 

एकनाथ खडसे यांची घरवासी गाजतेय ती त्यांची कन्या एडवोकेट रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहण्यावरून. रोहिणी खडसेंनी जाहीर केले आहे, की “मी भाजपात जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार.” रोहिणीच्या या वक्तव्यावर एकनाथ खडसे म्हणतात, “प्रत्येकाला व्यक्त स्वातंत्र्य आहे. रोहिणीने कोणत्या पक्षात राहावे, हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे.” तत्त्वाची भाषा बोलण्यासाठी ठीक असली तर भाजपच्या नेत्यांना खडसे यांचे वक्तव्य पटलेले दिसत नाहीत. त्यांना रोहिणी खडसे सुद्धा खडसेंबरोबर भाजपात आल्या पाहिजे, असे त्यांना वाटते. म्हणून रोहिणी खडसेंची भूमिका खडसेंसाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळेच खडसेंच्या घरवापसीला ‘अटी शर्तींची अट’ घातली जात आहे का? हा प्रश्न महत्त्वाचा मानला जातोय. एकंदरीत गेल्या ३०-३५ वर्षाच्या राजकारणात खडसेंनी आपल्या कर्तबगारीवर जो दबदबा निर्माण केला होता, तो त्यांचा बुलंद आवाज या घरवापसी प्रकरणाने दाबला जातो आहे, एवढे मात्र निश्चित. भाजपमधून तीन वर्षांपूर्वी बाहेर पडताना खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर जे आरोप केले, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतरही जी टीका केली, तुम्ही माझ्यामागे ईडी लावली तर माझ्या खिशात सीडी आहे, ती लावेन, असे म्हणणाऱ्या खडसेंना अचानक घरवापसीची आठवण का व्हावी? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. अलीकडे त्यांची प्रकृती सुद्धा त्यांना साथ देत नसल्याने त्यांनी ही वरमाईची भूमिका घेतली असावी. त्यातच त्यांच्या गौण खनिज प्रकरणात १३७ कोटी रुपये दंडाचे प्रकरण बाहेर आले. त्यानंतर गौण खळीच प्रकरणात त्यांना दिलासा मिळण्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने एकनाथ खडसे यांच्या दिल्ली वारी वाढल्या आणि भाजपमधील घर वापसी प्रकरणाला सुरुवात झाली. परंतु घरवापसी सन्मानाने व्हायला हवी, तथापि त्यात विविध प्रकारे चर्चा होतेय. तो प्रकार खटकणारा आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.