कोणता झेंडा घेवू हाती!

0

निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला असून प्रत्येक पक्ष आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतांना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पक्षांतराचे पिक जोरात आले आहे. कोण कुणाच्या पक्षात हे सांगणे कठिण होवून बसले आहे. मागील आठवड्यात भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, माजी नगराध्यक्ष करण पवार यांना गळाला लावण्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला यश आले असले तरी हा आनंद जास्त काळ टिकून राहिला नाही; कारण याच मतदारसंघातील तब्बल चारशे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत डेरेदाखल झाल्याने ठाकरे गटाला हादरा बसला आहे. शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्याने कार्यकर्ते कधी इकडे तर कधी तिकडे अशा उड्या मारत आहेत. भारतीय जनता पक्ष देखील अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा भरणा करण्यात मग्न झालेले दिसून येत आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात या कोलांटउड्या मोठ्या प्रमाणावर हाणल्या जात असल्या तरी त्यातून केवळ करमणूकच होत आहे. पालकमंत्र्यांनी जळगावातील तब्बल चारशे कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेवून बुलढाणा गाठले व तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांचा प्रवेश उरकवून घेतला. उद्धवसेनेला धक्का देण्याची ही संधीही मुख्यमंत्र्यांना सोडली नाही. रात्री उशिरा झालेला हा सोहळा दुसऱ्या दिवशीही होवू शकला असतात मात्र कार्यकर्ते आज इकडे आहे उद्या दुसरीकडे गेले तर काय होणार? या भितीनेच घार्इघार्इने प्रवेश सोहळा उरकविण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या ‘लग्नात’ विधानसभेची ‘मुंज’ करण्याचा हा प्रकार झालेला आहे. राष्ट्रवादीमधील फुटीचा फायदा बऱ्यापैकी भाजप घेतांनाही दिसत आहे. दोन्ही पवारांना हात जोडून हे कार्यकर्ते भाजपात श्रीरामाचा जयघोष करीत आहेत. प्रत्येकाला आपली पोळी भाजून घेण्याची घार्इ झालेली आहे. मध्यंतरी पक्षांतर बंदी कायद्याचा खुळखुळा वाजविण्यात आला होता; मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ते अंमलात आले नाही. रोज पक्ष बदलविणाऱ्या कार्यकर्त्यांना थोडेही फजित वाढत नाही यापेक्षा दुसरे दुर्दैव कुठले असणार? नेत्यांचे पक्षांतर होत असल्याने कार्यकर्ते देखील कसे मागे राहणार हाही प्रश्नच आहे. ज्या पक्षावर, नेत्यावर गत काळात टीका केली आज त्याच पक्षाचे किंवा नेत्याचे गुणगाण गाण्याची वार्इट वेळ या सगळ्यांवर आली आहे. स्वार्थासाठी होत असलेला हा ‘कार्यक्रम’ मात्र सुज्ञ मतदार उथळून लावतात हे ध्यानात घेतले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.