गिरीश महाजन यांची विकास कामात आघाडी..!

0

 

विशेष संपादकीय

 

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर विधानसभा मतदार संघाचा कायापालट करणारी विकास कामे होत आहेत. त्यापैकी एक महत्त्वाचे काम म्हणजे वाघूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून बंदिस्त पाईपलाईन द्वारे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणे हे होय.. शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष पाणी पोहोचविणारी ही देशातील एक अभिनव योजना होय. वाघूर उपसा सिंचन प्रकल्पास २२२२.३१ इतक्या किमतीची सुधारित मंजुरी प्राप्त असून टप्पा क्रमांक एक १० हजार १०० हेक्टर आणि टप्पा क्रमांक दोन मधून १०३२ हेक्टर असे एकूण ११ हजार १३३२ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आणि त्यासाठी ४ हजार शेततळे निर्माण करण्यात आले आहेत. ४ हजार शेततळे एकूण जामनेर तालुक्यातील ४६ गावांमध्ये तयार करण्यात आले आहेत. या देशातील अभिनव योजनेचा शुभारंभ तथा लोकार्पण सोहळा खुद्द ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते सोमवारी पार पडला. त्यामुळे जामनेर तालुका या वाघूर उपसा सिंचन योजनेमुळे सुजलाम सुफलाम होणार आहे. जिल्ह्यातील अनेक उपसा सिंचन योजना बंद पडल्या असताना वाघूर उपसा सिंचन ही अभिनव योजना कार्यान्वित होत आहे हे विशेष. गिरीश महाजन यांनी वाचाळपणाला फाटा देऊन प्रत्यक्ष विकास कामे करण्याचा आदर्श निर्माण केला आहे. जळगाव शहरात ५० ते ६० एकर मध्ये मेडिकल हब या प्रकल्पाचे जनक सुद्धा गिरीश महाजन हेच आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासाठी एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याची भाजप सरकारचे धोरण असताना जळगाव जिल्ह्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या महाविद्यालया व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या पॅथी असलेल्या मेडिकल हबला एका परिसरात मंजूर करून घेऊन गिरीश महाजन यांनी आपल्या स्वप्नातील ड्रीम प्रोजेक्टला जिल्ह्यासाठी मंजूर करून आणला. जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या सुविधांसाठी मेडिकल हब फार उपयुक्त ठरणारे आहे. या मेडिकल प्रकल्पाचे काम जवळजवळ ५५ % इतके पूर्ण झाले असून येत्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्याचे उद्घाटन होऊन येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू होईल. त्यामुळे मेडिकल हब हा गिरीश महाजन यांचा ड्रीम प्रोजेक्ट प्रत्यक्ष अस्तित्वात येत आहे. आता जळगाव जिल्ह्यातील गरीब रुग्णांना मुंबईला जाण्याची आवश्यकता राहणार नाही. आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील अनेक गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या रुग्णांना दिल्लीला उपचारासाठी दाखल करून त्यांचे मोफत उपचार करण्यासाठी गिरीश महाजन यांची यंत्रणा स्वतंत्रपणे कार्यरत होती. आता त्यांचा तो त्रास कमी होणार आहे. गिरीश महाजनांकडे पर्यटन खाते असल्याने जिल्ह्यातील पद्मालय गणपती मंदिरात १० कोटी रुपयाचा निधी मंजूर केल्याने पद्मालय परिसराचा सुद्धा कायापालट होणार आहे. अमळनेर येथील मंगळ ग्रह मंदिराला सुद्धा ५ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. संत मुक्ताई मंदिराला सुद्धा पर्यटनाचा दर्जा येण्यासाठी पर्यटन खात्यातर्फे निधी मंजूर केला गेला आहे. याव्यतिरिक्त आसोदा येथील निसर्ग कन्या बहिणाबाई चौधरींचे स्मारक निधी अभावी रखडले होते. त्या स्मारकालाही एक पाऊल पुढे जाऊन पर्यटन खात्यात पासून १० कोटीचा निधी जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर केल्याने आता बहिणाबाई चौधरींचे स्मारक हे सुद्धा साहित्यिकांसाठी प्रेरणास्थळाबरोबरच पर्यटन स्थळ बनणार आहे. आणि ते त्याचे श्रेय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनाच द्यावे लागेल…

गिरीश महाजन हे गेल्या ३० वर्षापासून जामनेर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. आता तर त्यांना जामनेर तालुक्यात विरोधकच शिल्लक नाही. आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर ते तालुक्यात अनभिक्षित सम्राट बनले आहेत. २०१४ ते २०१९ या ५ वर्षाच्या काळात ते जलसंपदा या महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होते. जिल्ह्यातील वाघूर, शेळगाव बॅरेज, हातनुरचा डावा कालवा आणि अपूर्ण असलेल्या कामांना निधी मिळवून दिला. अमळनेर तालुक्यातील पाडळसे धरणाच्या निधीसाठी त्यांचा केंद्राच्या बळीराजा योजनेत समावेश करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची आता फलश्रुती होते आहे. सध्या जळगाव येथे भव्य क्रीडा संकुल योजनेस मंजुरी मिळवून त्याच्या कामालाही मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्याच्या विकास कामाच्या प्राप्तीसाठी कसलेही अकांड तांडव न करता काम करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात त्यांना आगळे वेगळे मानाचे स्थान आहे. भाजपसाठी तर ते संकटमोचकच म्हणवले जातात. पक्षासाठी वेळोवेळी अशी भूमिका सुद्धा गिरीश महाजन पार पाडतात. भाजप बरोबरच त्यांचे विरोधी पक्षात सुद्धा चांगले मित्रत्वाचे संबंध आहे. म्हणून त्यांना आवाज अजातशत्रू म्हणून संबोधले जाते. नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जळगाव सभा झाली. त्या सभेसाठी गिरीश महाजन यांनी जे नियोजन केले त्याची अमित शहा यांनी सुद्धा स्तुती केली. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीचे जीएम फाउंडेशनचे हायटेक पद्धतीचे कार्यालय भाजपसाठी दिले. याचे उद्घाटन अमित शहा यांनी व्यस्त असतानाही वेळात वेळ काढून केले. त्यामुळे गिरीश महाजन यांचे भाजप पक्षातील स्थान आणखी बळकट झाले आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अशा विकास पुरुषाच्या भावी वाटचालीसाठी दैनिक लोकशाहीच्या शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.