सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिचून पुतळा अनावरण

0

लोकशाही संपादकीय लेख 

 

जळगाव महानगरपालिकेच्या वतीने मनपा प्रशासकीय इमारती समोर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे तसेच पिंप्राळा येथे शिवस्मारक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काल अनावरण शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होऊन लोकार्पण करण्यात आले.

गेल्या पंधरा दिवसांपासून या दोन्ही पुतळ्यांच्या अनावरणाची तयारी चालू होती. सर्व प्रशासकीय नियमानुसार या दोन्ही पुतळ्यांचे अनावरण करण्याची प्रक्रिया महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मनपाच्या सर्वपक्षीय नगरसेवकांच्या संमतीने केलेली होती. तथापि रविवार दिनांक 10 सप्टेंबरला पुतळा अनावरणाचा सोहळा ठरला असताना प्रोटोकॉलचे पालन केले नाही म्हणून सत्ताधारी पक्षांकडून या पुतळे अनावरण सोहळ्याला स्थगिती आदेश देण्यात आला होता. त्यावरून दिवसभर जळगाव शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक, भाजप शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादी गट हे आमने-सामने आले होते. अनावरण करता येत नाही असा पवित्रा राज्य सत्ताधारी पक्षाने घेतला होता. तथापि पुतळे अनावरणाच्या सर्व नियमांचे पालन करून हा सोहळा जाहीर करण्यात आला असून आम्ही कोणत्याही नियमांचा भंग केला नाही, अशी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मांडली.

 

रीतसर पुतळे अनावरण सोहळ्याचे सर्व नियमांचे सोपस्कार पूर्ण केले असून त्याला प्रशासनाने सुद्धा संमती दिली आहे. त्यानुसार रविवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी उद्धव ठाकरे यांचे हस्ते पुतळ्यांचे अनावरण होणारच आणि ठरल्याप्रमाणे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची वचनपूर्ती जाहीर सभा होणारच हा पवित्रा महापौर उपमहापौर आणि त्यांच्या शिवसैनिक सदस्यांनी घेतला. परंतु रविवारी काय दांगडो होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना काल शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जळगाव शहरात मनपातर्फे तसेच शिवसैनिकांतर्फे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दोन्ही पुतळ्यांचे अनावरण उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होऊन लोकार्पण झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे जळगाव शहराचे भाजपचे आमदार राजू मामा भोळे हे उघडे पडले. परवा दिवसभर मंत्रालयात बसून सत्ताधाऱ्यांना डावलून अनावरण करणे म्हणजे प्रोटोकॉलचे उल्लंघन करणे होय, असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही पुतळ्यांचे अनावरण होता कामा नये असा चंग आमदार राजू मामा भोळे यांनी बांधला होता.

 

पुतळे अनावरण सोहळ्याला स्थगिती आदेश मिळविण्यात ते यशस्वी झाले. परंतु शासनाच्या स्थगिती आदेशाला महापालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सत्ताधाऱ्यांनी केराची टोपली दाखवली. जनशक्ती पुढे सत्तेची शक्ती येथे कुचकामी ठरली. त्यामुळे काल दिवसभर पुतळे अनावरणाच्या सोहळ्यासंदर्भात जी अनिश्चितता निर्माण झाली असे वाटत होते त्याला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकांनी एकजुटीने छेद दिला आणि काही झाले तरी पुतळ्याचे अनावरण उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणारच, आम्ही आता मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे सत्ताधाऱ्यांना पर्यायाने प्रशासनाला नमते घ्यावे लागले. प्रशासनातर्फे तांत्रिक कारण पुढे करून जर पुतळे अनावरण सोहळ्याचा विरोध झाला असता तर जळगाव शहरातील शांततेला इजा पोचली असती आणि त्याला सत्ताधाऱ्यांना जबाबदार धरले गेले असते.

 

सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला प्रोटोकॉल कोलदंडा घालण्याचा भाजप आमदार राजू मामा भोळे आणि सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न फसला, असे म्हणता येईल. आमदार राजू मामा भोळे यांनी आगामी 2024 च्या निवडणुकीवर डोळे ठेवून आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला पण ते प्रयत्न त्यांच्या अंगलट आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्री शिंदे गटाचे असले तरी त्यांनी पुतळ्याच्या अनावरणाला उघड विरोध दर्शवला नाही. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या भूमिकेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिकांनी समर्थन केले. तथापि जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे यांनी मात्र पुतळ्यांना उघड उघड विरोध करून स्वतःचे हसे करून घेतले. महापौर जयश्री महाजन यांनी तर आमदार राजू मामा भोळे यांना झारीतील शुक्राचार्य असा आरोप केला. गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत महापौर जयश्री महाजन यांनी जळगाव वासियांना इच्छा असूनही विकासाची कामे देता आली नाही. त्याला कारणीभूत सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचा तसेच शहराच्या आमदारांचा अडसर असल्याचा आरोप केला. तरीसुद्धा शहरवासीयांच्या अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न केल्यामुळे शहरवासीयांच्या मनात आम्ही सहानुभूतीचे घर केले आहे. त्यामुळेच भाजपला विशेषता जळगाव शहराचे भाजपचे आमदार राजू मामा भोळे यांच्या मनात पोटशुळ उठले आहे. म्हणून झारीतील शुक्राचार्य म्हणून चांगल्या कामांना खीळ घालण्याचा प्रयत्न आमदार भोळे करत आहेत, असा थेट आरोप महापौर जयश्री महाजन यांनी केला.

 

महापौर जयश्री महाजन यांनी उद्धव ठाकरे यांच्या वचनपूर्ती जाहीर सभेत जे छोटेखानी भाषण केले त्या संभाषणाची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्तुती केली. याचा अर्थ समझनेवाले को इशारा काफी है, असा होतो. जळगाव महापालिका 17 मधली प्रशासकीय इमारतीस सदर वल्लभभाई पटेल यांचे नाव दिले, तेव्हाच सरदारांचा पुतळा प्रशासकीय इमारती समोर उभारण्याचा निर्णय तत्कालीन पालिका प्रशासनाने एकमुखाने घेतला होता. त्याची पूर्तता महापौर जयश्री महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी केली. याबद्दल ते कौतुकास पात्र आहेत. तसेच तीन महिन्यांपूर्वी शिवसेना शिवस्मारकाच्या भूमिपूजन प्रसंगी जे आश्वासन उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी दिले होते, त्या आश्वासनाची पूर्ती त्यांनी महाराजांच्या पुतळा उभारून केल्याने उपमहापौर कुलभूषण पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजे…!

Leave A Reply

Your email address will not be published.