फडणवीसांना खडसेंची भीती वाटण्याचे कारण काय ?

0

विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते सर्वश्रुत आहे. आपल्या नेतृत्वाच्या आड येणाऱ्या भाजप मधील नेत्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे काटा काढला. मुख्यमंत्रीपदावर दावा करणारे एकनाथ खडसे असो अथवा जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे, असे म्हणणाऱ्या पंकजा मुंडे असो, किंवा फडणवीसांना अडसर ठरू पाहणारे माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे असो, यांना भाजपमधून निष्प्रभ करण्यास फडणवीस यशस्वी झाले. एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात दुसरे स्थान देऊन 12 खाते त्यांच्या सुपूर्त केले आणि भोसरी जमीन प्रकरणाचे बालंट उभे करून मंत्रिमंडळातून काढून टाकले. त्यानंतर त्यांना पक्षात अपमानास्पद वागणूक तर दिलीच, त्याचबरोबर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत यांचा आमदारकीचा पत्ता कट केला. हीच स्थिती विनोद तावडे यांची झाली.

पंकजा मुंडे यांना विधानसभेचे तिकीट देऊन त्यांचा पराभव करण्यात ते यशस्वी झाले. नेतृत्वाच्या लढाईत शहला-काटशह दिला असला तरी आता एकनाथ खडसे हे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारांच्या यादीत नाव दिले गेले होते. तीन वर्षे झाली त्या यादीला राज्यपालांनी अद्याप मंजुरी दिली नाही. राज्यपाल नियुक्त यादीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकनाथ खडसे यांचे नाव असल्यामुळे ती यादी रखडली, असे बोलले जाते. आता येत्या 20 जून रोजी विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी 11 उमेदवार रिंगणात आहेत. महा विकास आघाडीने सहा आणि भाजप भाजपचे पाच असे एकूण अकरा उमेदवार रिंगणात असून राज्यसभेवरील ही निवडणूक चुरशीची होणार असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार एकनाथ खडसे यांच्या उमेदवारी संदर्भात भाजपमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

एकनाथ खडसे पराभूत कसे होतील? यासाठी भाजपतर्फे खास रणनीती आखली जात आहे. एकनाथ खडसे यांची भाजपला एवढी भीती वाटण्याचे कारण काय ? विशेषतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना खडसेंची भीती वाटण्याचे कारण काय ? एकनाथ खडसे यांना विरोधी विधानसभेचे व्यासपीठ मिळाल्यानंतर ते व्यासपीठाच्या माध्यमातून भाजप विशेषता देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी वाढवणार एवढे मात्र निश्चित. कारण ज्या पद्धतीने एकनाथ खडसे यांना त्यांच्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीला गालबोट लावले होते, ते खडसे विधान परिषदेच्या व्यासपीठावरून निश्चितच वचपा काढतील. भोसरी प्रकरणाचे बालंट लावून खडसेंना मंत्रिमंडळातून काढून टाकल्यानंतर त्यांच्या पाठीमागे इन्कम टॅक्स, डॉन दाऊद इब्राहिमच्या पत्नीशी कथित संबंध, त्यांच्या जावयाच्या इमोजिन कारचे प्रकरण, त्यांच्या पीएच्या विरोधात कोट्यवधीच्या खंडणीचा गुन्हा दाखल अशा अनेक प्रकरणांचा समावेश खडसे यांच्या पाठीमागे लावण्यात आला.  मुख्यमंत्री फडणवीसांकडे राज्याचे गृह खाते असल्याने त्याचा त्यांनी वापर करून घेतला, असा आरोप सुद्धा खडसे यांनी केला आहे.

एकनाथ खडसे यांच्यावर जे जे आरोप लावले गेले, ते सिद्ध झाले नाहीत. किंबहुना त्याहून त्यांची निर्दोष सुटका झाली. तेव्हा विधानसभा अधिवेशनात एकनाथ खडसे यांनी केलेले भाषण गाजले. प्रत्येक आरोपाचे खंडन करून निर्दोषत्व सिद्ध केले. माझा गुन्हा काय आहे, हे सिद्ध करा, अथवा मी निर्दोष असल्याचे जाहीर करा, असा सवाल खुद्द एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना केला. खडसे यांचे विधान सभेतील हे भाषण अत्यंत अभ्यासू होते. देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यात अंजन घालणारे होते. म्हणून खडसे यांचे भाषण चालू असताना फडणवीस सभागृहातून बाहेर गेले होते. भाजप-सेना सत्ताधारी आमदार मंत्र्यांनी शांतपणे हे भाषण ऐकून जणू मूकसंमती दिली होती. विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून बाके वाजवून खडसे यांच्या आरोपाचे स्वागत केले जात होते.

विरोधकांकडून खडसे यांच्या भूमिकेचे समर्थन केले गेले. सत्ताधाऱ्यांनी ही खडसेंची भूमिका मान्य असली तरी, ते त्याचे जाहीरपणे समर्थन करू शकत नव्हते. एका बहुजन समाजातील ओबीसी नेतृत्व संपवण्याचा देवेंद्र फडणीसांवर आरोप होतो आहे. राजकारणात शह-काटशह हे प्रकार चालत असले तरी, एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन खडसे सारख्यांचे नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न फडणीसांनी केला, हे खडसे समर्थकांचे म्हणणे आहे. 20 जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत एकनाथ खडसे निवडून आले, तर मंत्रिमंडळात त्यांना निश्चित स्थान मिळणार यात शंका नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे मंत्री झाले तर, त्यांच्या मंत्री पदामुळे महा विकास आघाडी सरकारला एक प्रकारे बळच मिळणार आहे. एकनाथ खडसे यांच्या अनुभवाचा फायदा महा विकास आघाडीला मिळणार यात शंका नाही. त्याचबरोबर विरोधी पक्ष भाजप आणि विशेषतः विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची धार बोथट करण्यास खडसे यशस्वी होतील. त्यामुळे काही झाले तरी एकनाथ खडसे निवडून यायला नको, अशी विरोधी रणनीती फडणवीसांकडून होताना दिसते आहे. या विधानसभा निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी मिळू नये यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. राजकारणात काहीही तडजोड केली जाते, एकंदरीत एकनाथ खडसे यांची विधान भवनात एन्ट्री व्हायला नको, हे यावरून स्पष्ट होते. फडणवीस यांना एवढी भीती वाटण्याचे कारण काय ? असा प्रश्न निर्माण होणे सहाजिक आहे…!

Leave A Reply

Your email address will not be published.