नव्या कुलगुरूसमोरील आव्हाने…!

0

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरूपदी याच विद्यापीठ जैवशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय लक्ष्मीनारायण माहेश्‍वरी यांची काल राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी नियुक्ती केली. सोमवार दिनांक 7 मार्च रोजी आपल्या कुलगुरूपदाचा ते पदभार स्वीकारणार आहे. डॉ. विजय माहेश्‍वरी हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सन 1992 पासून कार्यरत असल्याने त्यांना कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापाठाची संपूर्ण माहिती आहे. विद्यापीठाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत त्यांनी सर्व चढउतार पाहिले आहेत. ते कबचौ उमविचे सातवे कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारतील. या आधी होऊन गेलेल्या 6 कुलगुरूंची कारकीर्द त्यांनी पाहिलेली आहे. या आधीच्या पाच कुलगुरूंनी आपल्या कुलगुरूपदाचा कालावधी पूर्ण केला आहे.

सहावे कुलगुरू प्रा.पी.पी. पाटील हे एक अपवाद असून त्यांनी 7 मार्च 21 रोजी म्हणजे कुलगुरूपदाचा कार्यकाळ संपण्याआधी एक वर्ष आधीच राजीनामा दिला. विद्यापीठातील राजकारणाला कंटाळून त्यांनी आपले पद सोडले. ते राजकारणाचा बळी ठरले. अन्यथा कुलगुरूपदाचा त्यांचा 4 वर्षाचा कालावधी चांगला होता. त्यांची चार वर्षाची कामगिरी वादग्रस्त नव्हती. परंतु विद्यापीठात चालणाऱ्या राजकारणावर ते अंकुश ठेवू शकले नाहीत. म्हणून मन: स्तापाने ते या पदाचा त्यांनी त्याग केला. परंतु मुदतीआधी कुलगुरूपद सोडावे लागल्याने कबचौ उमविच्या कारकीर्दीला गालबोट लागले. त्यामुळे विद्यापीठात असलेल्या उपटसुंभ राजकारण्यांना पध्दतशीरपणे त्यांची जागा दाखवून देण्याचे कसब नवे कुलगुरू डॉ. माहेश्‍वरींना करावे लागणार आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील विद्यापीठाच्या कुलगुरूपदासारख्या सर्वोच्च पदाचा हा बहुमान आहे. त्याबद्दल नवे कुलगुरू डॉ. विजय माहेश्‍वरी यांचे आम्ही स्वागत करतो. तसेच ते गेल्या 30 वर्षापासून अध्यापनाचे कार्य करीत असून त्यांना अध्यापनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. अध्यापनात त्यांचा हातखंडा असला तरी विद्यापीठात प्रशासनाचे कार्य त्यांना कुशलतेने करावे लागणार आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढ विकासासाठी त्यांच्या अध्यापकीय अनुभवाचा निश्‍चित फायदा मिळणार आहे.

गेले दोन वर्षे कोरोनामुळे विद्यापीठातील ऑफलाईन शिक्षणावर परिणाम झाला. सर्व शिक्षण हे ऑनलाईन पध्दतीने झाले. तथापि जळगावसारख्या ग्रामीण भागातील विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईनच्या पूर्ण सुविधा उपलब्ध नसल्याने त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. म्हणून आता नियमित ऑफलाईन शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. गेले वर्षभर कबचौउमवि अंतर्गत कुलगुरूपासून ते कुलसचिव प्रो. कुलगुरू, परीक्षा नियंत्रक वित्त लेखाधिकारी ही पदे ेपूर्णवेळ भरलेली नसल्याने तेथे प्रभारी पदाची सूत्रे काम करताहेत. कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर गेले वर्षभर नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन हे प्रभारी कुलगुरू म्हणून काम पहात होते. दोन विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा कारभार करणे हे सहज सोपे नाही.

वर्षभरात काही महत्वाच्या मिटींगसाठी डॉ. ई. वायुनंदन जळगावला असतील बाकी सर्व कारभार ऑनलाईन केला गेला. त्यामुळे निश्‍चित कामावर त्याचा परिणाम होतो. त्याचा फायदा खालचे अधिकारी घेतात. तसेच झालेही. त्याचबरोबर प्रो. कुलगुरू, कुलसचिव, परिक्षा नियंत्रक तसेच वित्त लेखाधिकारी ही विद्यापीठाच्या आत्मा असलेली पदे रिकामी असल्याने तेथे प्रभारी राज चालू आहे. नवे कुलगुरू डॉ. विजय माहेश्‍वरी यांनी सर्वप्रथम विद्यापीठातील प्रभारी राज संपविले पाहिजे. ते त्यांच्यापुढे आव्हानच म्हणता येईल. सर्व रिक्त पदे भरल्यानंतर विद्यापीठाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी मदत होऊ शकते. विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या झालेल्या कुलगुरूंच्या कारकीर्दीची तुलना करणे तसे योग्य होणार नाही.

तथापि आपल्या कुलगुरूपदाच्या कारकीर्दीचा ठसा उमटला पाहिजे. तशी कामगिरी नवे कुलगुरू डॉ. विजय माहेश्‍वरी यांचेकडून अपेक्षित आहे. तसे ते करतील यात शंका नाही. विद्यापीठातील सर्व डिपार्टमेंटस अपडेट करणे, चांगल्या प्राध्यापकांची भरती करणे, विद्यापीठातून चांगले शिक्षण घेऊन उच्चशिक्षित विद्यार्थी जेव्हा बाहेर पडतील तर त्या विद्यार्थ्यांमुळे विद्यापीठाचा नावलौकिक वाढला पाहिजे. विद्यापीठाच्या विविध विभागातून संशोधन करून पीएचडी पदवी घेऊन बाहेरच्या जगात गेलेल्या विद्यार्थ्यांमुळे संशोधन क्षेत्रात विद्यापीठाचा नावलौकिक वाढला पाहिजे. विद्यापीठ हे शिक्षणाची पदवी -पदव्युत्तर शिक्षण देणारी फॅक्टरी आहे. असे लेबल लागता कामा नये. संख्यात्मकतेला गुणवत्तेची जोड देण्याची आवश्‍यकता आहे. कबचौ उमविचे नवे कुलगुरू डॉ. विजय माहेश्‍वरी यांनी विद्यापीठातील सर्व आव्हाने पेलतील आणि त्यांची कुलगुरू पदाची कारकिर्द ठसा उमटविणारी राहील या डॉ. विजय माहेश्‍वरींना शुभेच्छा..

Leave A Reply

Your email address will not be published.