सकळजनसखा तू स्वामी आणीक नाही I

0

करुणाष्टक -10
तुजविण मज तैसे जाहलें देवराया I
विलग विषमकाळीं तूटली सर्व माया II
सकळजनसखा तू स्वामी आणीक नाही I
वमकवमन जैसें त्यागिलें सर्व कांही II

सर्वच काळ नेहमी अनुकूल असतो असे नाही, काही अनुकूल असतो काही प्रतिकूल असतो. केवळ एखाद्या व्यक्तीबाबत असा हा विषम काळ येतो व जातो, पुन्हा येतो. काही नसर्गिक आपत्ती येतात, पूर येतो तर दुष्काळ पडतो, साथीचे रोग येतात, परकीय आक्रमण होतात. समर्थांच्या काळी हे अत्याचार, धार्मिक जुलूम वगैरे अनिवार झाले होते. सुलतानी आक्रमण होऊन प्रचंड दहशत लोकांवर ठेवली जात होती. त्यांना स्वातंत्र्य नव्हते, सुरक्षितता नव्हती. मंदिराची मोडतोड होत होती पण कोणी काही करू शकत नव्हते. पारतंत्र्यामुळे लोकांची वृत्ती ‘पडखाऊवृत्तीची’ झाली होती. यात आत्मस्वकीय, समाज बांधव, राष्ट्राचे नागरिक या ना त्या नात्याने सर्वजण भरडले जात होते. प्रचंड उलथापालथ होऊन समाज जीवन विस्कळीत होत होते. “आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना” असे म्हणून समाज मनच हतबल होत होते.

या पार्श्वभूमीवर समर्थ म्हणतात, रामा मला तुझ्याशिवाय कोण आहे? माझ्या मनाची तळमळ अर्थात तू जाणतोच ना? तू कृपाळु, काही काळ अनुकूल देतोस व काही काळ प्रतिकूल. कारण सर्वच काळ अनुकूल दिला तर सगळेच राजे होतील म्हणून काही काळ असा तर काही काळ तसा देशील. “जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे” हे वास्तव सत्य असते आणि दुःखाच्या काळात किंवा अंतकाळी रामा शिवाय कोणी सहाय्य करत नाही. “विलग विषमकाळी तूटली सर्व माया”.

या संसार दुःखात, त्रिविध तापात आपल्याला सखा असणं हीच भाग्याची गोष्ट आहे. ज्यामुळे हा काटेरी जीवन प्रवास सुसह्य होतो, सुखावह होतो. गुरु – शिष्य, पिता- पुत्र बंधू- भगिनी हे नाते तर श्रेष्ठ खरेच पण मित्राच्या नात्यात मर्यादा ओलांडून जाणाऱ्या असतात. भगवान श्रीकृष्णाने आपला सहृदय मित्र सुदाम्याच्या घरचा पोह्यांचा पाहुणचार घेतला व आपल्या या मित्राची सुदाम नगरी सोन्याची करून दिली. मैत्री जात – पात, आर्थिक स्तर, बौद्धिक स्तर या साऱ्याला ओलांडून जाणारी असते. निखळ मैत्री तेथे कुठलेच निकष नसतात. ‘माझीया जातीचा मज भेटो कोणी’ हीच असते असा हा सखा असा आपल्या आवडीचा धनी असतो, स्वामी असतो. समर्थ म्हणतात, “सकळजनसखा तू स्वामिं आणिक नाहीं”.

तुझ्याशिवाय माझे अन्य कोणी नाही. तूच ‘समर्थ दाता’ पैलपार नेणारा माझा एकमेव कैवारी आहेस. समर्थ म्हणतात हा संसार किंवा संसाराचे अनुभव हे घोर आहेत. आपणच विष घ्यायचे व सुखाचा अनुभव हवा असे म्हणायचे यात काय तथ्य.

संत मीराबाई ने राजघराण्याचा त्याग केला कारण त्यांनाही एक गिरीधर गोपालच प्रसन्न झाला. लौकिकातील पैसा, मान सन्मान, स्थावर मालमत्ता हे काही मर्यादेपर्यंत सुख देणारे आहेत. पण याच बरोबर व्यग्रता, असमाधान, संघर्षाला ही या गोष्टी कारणीभूत ठरतात. याची पूर्ण जाणीव भक्तांना व संतांना असते. त्यांच्या ठिकाणी विवेक बालपणापासून जागृत असतो. कशाला किती महत्त्व द्यायचे, प्रयत्नवादाविषयी तेही सतर्क असतात. उत्तम संस्कार असावेत, उत्तम शिक्षण द्यावे आपली नोकरी, धंदा, व्यापार नीट करावा हे त्यांनाही अभिप्रेत असते. “आधी प्रपंच करावा नेटका I” ही शिकवण त्यांचीच पण नुसता प्रपंच करावा व परमार्थ पूर्ण बुडवावा असे कोठेच सांगितले नाही.

“देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलागांसी तुटी I सर्व अर्पावे शेवटी प्राण तो ही वेचावा II” इतका तीव्र संवेग असेल, निश्चय असेल तरच असे घडू शकते.

समर्थ पुढे म्हणतात, “वमकवमन जैसे त्यागिलें सर्व कांही”. वमन याचा साधा सरळ अर्थ जे अन्न पचले नाही ते उलटून बाहेर पडते व काही खायची वासना काही काळ तरी राहात नाही. तर आयुर्वेदात वमन चिकित्सा, मुद्दाम त्रिदोष जाण्यासाठी भरपूर मीठ पाणी पिऊन विष बाहेर काढतात. शरीरातील दोष जाऊन शरीर ताजेतवाने होते. संतांनी ऋषिमुनींनी असे विषय, नाना छंद याचा जाणीवपूर्वक त्याग केला. स्वामी विवेकानंदांची बुद्धिमत्ता असामान्य नव्हती ? पण ते त्यांचे ध्येय नव्हते. समर्थ “समर्थ” या पदवीला प्राप्त झाले कारण लौकिकाचा त्यांनी त्याग केला. माणसाच्या जीवनात त्यागाला महत्त्व आहे. कारण त्यानेच तो यशस्वी होतो. येथे त्यागाचे महात्म्य समर्थांनी आपल्याला पटवून दिले आहे.

II जय जय रघुवीर समर्थ II
लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.