ब्रेकिंग ! काँग्रेसला डॉ. उल्हास पाटलांचा ‘जय श्री राम’

0

 मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांनी आज आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांना आता पूर्ण विराम भेटला आहे.

डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा पाटील, देवेंद्र मराठे यांचे कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आले होते. यानंतर डॉ. उल्हास पाटील यांनी पत्रकार परिषद स्पष्ट केले होते की, आपली कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपमध्ये प्रवेश करणार असून आपण देखील लवकरच निर्णय घेणार आहोत.

दरम्यान आज बुधवार रोजी मुंबईत प्रवेश सोहळा पार पडला. यात डॉ. उल्हास पाटील, डॉ. केतकी पाटील, देवेंद्र मराठे, शैलेश राणे यांच्यासह अन्य मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन या नेत्यांनी यांचे स्वागत केले. तसेच डॉ. केतकी पाटील यांची राज्य महिला उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली आहे.

आता काँग्रेस पक्षाला एकावर एक मोठे झटके बसत आहेत. काँग्रेस पक्षाचे नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर आता डॉ. उल्हास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला दुसरा मोठा झटका बसला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय चित्र नक्कीच बदलणार आहे. तसेच यामुळे लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढणार असल्याची जोरदार चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.