उल्हास पाटलांचा भाजप प्रवेश : शोध अन् बोध

0

लोकशाही संपादकीय लेख 

माजी खासदार गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी परिवारासह काल मुंबई येथे भाजपा प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश अपेक्षितच होता. कारण गेल्या काही महिन्यांपासूनच त्यांची भाजपशी निर्माण झालेली जवळीक तसेच त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांची वक्तव्य पाहता लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सत्ताधारी भाजपात प्रवेश करून भाजपतर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची डॉ. केतकी पाटील यांची प्रबळ इच्छा असल्याचे जाणवत होते. डॉ. उल्हास पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघातून चार वेळा पराभव प्राप्त केल्याने तसेच वयाची साठी ओलांडली असल्याने कन्या डॉ. केतकी पाटील हिला राजकारणातील त्यांचा वारसदार करण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. परंतु गेल्या ४६ वर्षापासून स्वतः डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेस पक्षाचे सक्रिय एकनिष्ठ असताना तसेच वारंवार भाजप विरोधात वक्तव्य करणारे डॉ. उल्हास पाटील भाजपात प्रवेश करतील यावर विश्वास बसत नव्हता.

कन्या डॉ. केतकी पाटील यांना येत्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस पक्षाला ही जागा मिळाली असती. परंतु काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळाली तरी डॉ. केतकी पाटील विजयी होतील का? हा प्रश्न त्यांच्या मनात असावा. म्हणून भाजपात प्रवेश करून माझ्यातर्फे डॉ. केतकी पाटलांसाठी उमेदवारी मिळवून रावेर लोकसभेची निवडणूक लढवण्याची डॉ. उल्हास पाटील यांची इच्छा असावी. त्यामुळेच त्यावर डोळा ठेवून डॉ. उल्हास पाटलांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला असेल, नव्हे जनमत तसेच आहे.. परंतु काँग्रेस पक्षात उल्हास पाटलांना जे मानाचे स्थान होते ते भाजपात कितपत राहील? याबाबत काळच उत्तर ठरवेल. २००४ ते २०१४ पर्यंत केंद्रात तसेच महाराष्ट्रातून काँग्रेसची सत्ता असताना डॉ. उल्हास पाटलांनी त्या सत्तेचा पुरेपूर उपभोग घेतला नाही का? डॉ. उल्हास पाटील यांना काँग्रेस पक्षाच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी प्रत्यक्ष संबंध होते. या दोन्ही नेत्यांना भेटण्यासाठी डॉ. पाटलांना कुठल्या मध्यस्थीची गरज नव्हती. एवढे त्यांचे निकटचे संबंध होते. त्या संबंधाचा फायदा जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी तसेच जळगावात जास्तीत जास्त आमदार तसेच खासदार निवडून आणण्यासाठी डॉ. उल्हास पाटलांचे किती योगदान दिले याबाबत त्यांनीच अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.

जिल्हा काँग्रेसवर स्वतःचे वर्चस्व असताना सुद्धा 2014 साली काँग्रेस पक्षाने रावेर लोकसभेसाठी काँग्रेसने उमेदवारी नाकारले असताना काँग्रेसची बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचा दारुण पराभव झाला. त्यांचे डिपॉझिट जप्त झाले. त्यामुळे पक्षशिवाय डॉ. उल्हास पाटलांची ताकद किती? हे त्यावेळी स्पष्ट झाले. तरीसुद्धा काँग्रेस पक्षाशी बंडखोरी केली असताना त्यांना काँग्रेस पक्षात स्थान दिले. परंतु अशा काँग्रेस पक्षाशी नाते तोडून नीती तत्त्वांना तिलांजली देऊन स्वार्थासाठी त्यांनी भाजपात प्रवेश केलाय, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. फोडाफोडीचे राजकारण करण्यात भाजप माहीर आहे. त्याला डॉ. उल्हास पाटील बळी पडले, असेच म्हणावे लागेल. जी मंडळी शिंदेसेना तसेच अजित पवारांची राष्ट्रवादी मधील भाजपला शरण गेले ते त्यांच्या भ्रष्ट कर्तृत्वामुळे होय. तशी स्थिती डॉ. उल्हास पाटलांची नसताना अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुती सुमनांचा वर्षाव करणारे डॉ. उल्हास पाटील एवढे बदलले कसे? त्यांचे आश्चर्य जळगाव जिल्ह्यातील जनतेला वाटत आहे. केवळ आणि केवळ रावेर लोकसभेची जागा मिळावी, या उद्देशाने आणि कन्या डॉ. केतकी वरील प्रेमापोटी डॉ. उल्हास पाटलांनी काँग्रेसचा त्याग केला, असे जिल्ह्यातील जन्मत आहे. शेवटी द्राक्ष खाण्यासाठी ‘कितने अच्छे है अंगूर’ म्हणणाऱ्यांना द्राक्ष खायला मिळाली नाहीत तर ‘कितने खट्टे है अंगूर’ म्हणून टीका केली जाते. तशातला प्रकार डॉ. उल्हास पाटलांच्या बाबतीत झाला आहे. अगदी अलीकडे काँग्रेस पक्षात त्यांना एकाधिकारशाही असल्याची जाणीव झाली. आतापर्यंत एकाधिकारशाही काँग्रेस पक्षात नव्हती का? होती तर त्याविरुद्ध आवाज का उठवला नाही? असो डॉ. उल्हास पाटलांच्या भाजप प्रवेशाचा फायदा कोणाला होणार आहे, हे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच…!

Leave A Reply

Your email address will not be published.