आ. किशोर पाटील आणि पत्रकार संदिप महाजन यांच्यातील वाद सामंजस्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार – मा.आ. दिलीप वाघ

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

मतदार संघाचे आमदार किशोर पाटील व पत्रकार संदिप महाजन यांच्यात झालेल्या वादाचे पडसाद संपुर्ण महाराष्ट्रभर उमटले असून, येणार्‍या काळात हा वाद विकोपाला जाऊन अनर्थ घडू नये. शहराची व मतदार संघाची शांतता भंग होऊ नये म्हणून या विषयाला राजकीय वळण न देता मी दोघांनाही एक पाऊल मागे घेत हा वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असून माझ्या या प्रयत्नाला यश येईल, असा विश्वास राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

मा. आ. दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी नगरपालिकेचे मा. गटनेते संजय वाघ, खलिल देशमुख, प्रकाश भोसले, शशी चंदिले, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सुनिल पाटील, गोपी पाटील आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना दिलीप वाघ म्हणाले की, मतदार संघातील गोंडगाव येथील कल्याणी या ७ वर्षाच्या बालिकेची घटना ही मन सुन्न करणारी आहे. यासंदर्भात सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत असून, समाजमनाच्या भावना संतप्त आहेत. आम्हीही लोकप्रतिनीधी या नात्याने पक्षाच्या पदाधिकार्‍यांसह या घटनेचा निषेध केला. दरम्यानच्या काळात आमदार किशोर पाटील व पत्रकार संदिप महाजन यांच्यात वेगळाच वाद निर्माण होऊन शहरासह तालूक्यात वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

या घटनेने संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष पाचोर्‍याकडे लागले आहे. या घटनेमुळे मुळ विषय हा बाजुला राहिला आहे. गोंडगाव प्रकरणातील आरोपी पोलिसांना सहकार्य करित नसल्याने तपासात अनेक अडचणी येत आहेत. अशात लोकप्रतिनीधी आणि पत्रकार यांच्यातील वाद हा वेगळे वळण घेत आहे. येणार्‍या काळात अनेक मोर्चे, रॅल्या, आंदोलने होऊन शहरासह मतदार संघात सामाजिक आणि कायदा व सुव्यवस्थेबाबतचे गंभीर प्रश्न निर्माण होतील. मतदार संघात यापूर्वी असे घडले नव्हते. दोघांनी परिस्थिती समजून घेतली पाहिजे, तरी हा वाद दोघांनी आहे त्या स्थितीत थांबविण्यासाठी मी स्वतः आमदार किशोर पाटील व पत्रकार संदिप महाजन यांच्याशी बोलणार आहे. माझा विश्वास आहे हा विषय येथे थांबून मुळ विषयाला गती देण्यास पत्रकार आणि लोकप्रतीनीधींचे सहकार्य मिळून, आरोपीला कठोर शासन होण्यास मदत होईल. अशी भुमिका मा.आ. दिलीप वाघ यांनी घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.