सोयी-सुविधांचा अभाव : स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
धानोरा, ता. चोपडा ;- तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या धानोरा येथील स्मशानभूमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असतांनाही त्याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी अक्षम्य दुर्लक्ष केल्याने स्मशानभूमीचा वनवास संपण्याचे नाव घेत नाही. वाढत्या समस्यांनी स्मशानभूमीच ‘चिते’वर असल्याचे चित्र आहे.
येथील बिडगाव रस्त्यावर हिंदू स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच्या बाजूने शेतनाला असून मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे उगवलेली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील समस्या वाढतच असतांनाही ग्रामपंचायतीनेही त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या स्मशानभूमीच्या जागेचा वाद निर्माण झाला असून हा वाद सामंज्यसाने सोडविणे महत्वाचे आहे. जीवनात सोळा संस्कारांपैकी अत्यसंस्कार हा आयुष्यातील शेवटचा व महत्त्वाचा संस्कार असतांनाही त्यासाठीही देखील हाल होत असतील तर लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीने या गंभीर समस्येकडे लक्ष केंद्रीत करुन स्मशानभूमीची नव्याने उभारणी करुन तेथे सोयी-सुविधा देणे महत्त्वाचे झाले आहे.
शेवटच्या क्षणीही वाताहातच!
आयुष्यभर माणूस मरमर करीत असून सोयी-सुविधांसाठी धडपड करीत असतो. कुणाला त्यात यश येते तर कुणाला अपयश मात्र प्रत्येकाचा शेवट गोड व्हावा यासाठी अंत्यसंस्कार सर्व सोपस्कार पूर्ण करुन केले जातात; परंतु स्मनाभूमीतील समस्यांनी शेवटचा क्षणही वाताहातीत जात असेल ते त्याचा काय उपयोग?
गेल्या अनेक दिवसांपासून स्मशानभूमी दुरुस्तीची मागणी करुनही त्याकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे. शासनस्तरावरुन स्मशानभूमी देखभाल व दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत असतांनाही येथील स्मशानभूमीत कुठल्याही सुविधा नाहीत. हा प्रश्न त्वरीत सोडवावा अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल.
– सचिन साळुंखे,
सामाजिक कार्यकर्ते
स्मशानभूमीची दुरवस्था झालेली आहे, मात्र तेथे जागेचा वाद असल्याने दुरुस्ती करण्यास अडचण येत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर या संदर्भात तोडगा काढून स्मशानभूमीची समस्या दूर केली जार्इल. तेथे सोयी-सुविधा पुरविण्यावर ग्रामपंचायत काम करणार आहे.
– रज्जाक तडवी,
सरपंच, धानोरा