सावंतवाडी, लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात शाब्दिक चकमक सुरूच असते. आता आदित्य ठाकरे आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यात चांगलाच वाद प्रतिवाद सुरु आहे.
उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी काल (दि.२१) सावंतवाडीत मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या बद्दल काय बोलणार ते खोके सरकार मधील आहेत, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. याबाबत मंत्री केसरकर यांना छेडले असता ते म्हणाले, या ठिकाणी माझ्याच मतदार संघात येवून आदित्य ठाकरे माझ्या विरोधात बोलत असतील तर ते मी सहन करणार नाही. ते माझ्या पेक्षा लहान आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात बोलताना मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. मी त्यांच्या मतदार संघात जावून बोललो तर त्यांना परवडणार नाही, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.
तसेच आजपर्यंत मी ठाकरे कुटुंबियांच्या विरोधात बोललो नाही. त्यांनी तशीच टीका सुरू ठेवली तर मी त्यांच्या मतदार संघात जावून त्याच्या विरोधात अनेक काही गोष्टी बोलू शकतो. मात्र त्यावेळी ते ठाकरेंना परवडणार नाही. असा इशारा त्यांनी यावेळी दिला.