तार जोडण्यासाठी गेलेल्या कंत्राटी वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

0

अडावद, ता. चोपडा : येथील वीज वितरण कंपनीच्या अडावद सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वटार रस्त्यावरील वीज खांबावरील तुटलेला तार जोडण्यासाठी गेलेल्या कंत्राटी वायरमनचा आज सकाळी विजेच्या धक्याने मृत्यू झाला. तर अन्य दोन कर्मचारी जखमी झाल.

याप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, विजेचा धक्का बसलेल्या वायरमनला अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले असता दोनपैकी एकही वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध नव्हते. तर वेळेत उपचार न मिळाल्याने वायरमनचा मृत्यू झाल्याचा आरोप या वेळी सरपंचासह ग्रामस्थांनी केला. त्यामुळे आरोग्य केंद्राचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

अडावद येथील सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वटार रस्त्यावरील वीज खांबावरील तुटलेली तार जोडण्यासाठी ६ रोजी सकाळी ८ वाजता परमिट घेऊन तीन कर्मचारी कर्तव्यावर गेले होते. यात ८ महिन्यांपासून कंत्राटी वायरमन म्हणून काम करणारे दिलीप मोतीराम बारेला (वय २८, रा. आडगाव) हे वीज खांबावर चढले. मात्र, तार जोडत असताना विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला अन् खांबावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबतचे लाईनमन राहूल मनोरे आणि सत्यप्रकाश वाघ हे देखील जखमी झाले आहेत.

या प्रकरणी मयताचे भाऊ आयुष्यमान सुरेश मोतीराम बारेला यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात अडावद वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सचिन केदारे, उपकार्यकारी अभियंता साळुंखे, कार्यकारी अभियंता रमेश पवार, ठेकेदार सुमित चौधरी, कर्मचारी योगेश पाटील या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.