कॉपी मुक्तीच्या मोहिमेतही कॉपी पुरविण्याचा प्रयत्न

0

लोकशाही संपादकीय लेख

मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या महाराष्ट्रभरात परीक्षा सुरू झाल्या. बारावीचा पहिलाच पेपर इंग्रजीचा होता. इंग्रजी आणि गणित या पेपराला कॉफीचा सुळसुळाट असतो, असा आजवरचा अनुभव आहे. तथापि यंदा जिल्हा प्रशासनाने बारावी तसेच दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात होण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेतली, आणि या मोहिमेला यश सुद्धा प्राप्त झाले. जळगाव जिल्ह्यातील बारावीच्या इंग्रजी पेपरला एकही कॉपी झाली नाही, असे जिल्हा शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी सांगितले. एवढी कडक मोहीम राबवल्याने ते शक्य झाले असले तरी जळगाव शहरातील बाहेती महाविद्यालय आणि सिद्धिविनायक हायस्कूलच्या केंद्रावर कॉपी पुरवण्याचा प्रयत्न झाला. तो प्रशासनाने हाणून पाडला. तथापि कायदा करणाऱ्यांपेक्षा कायदा मोडणारे अधिक हुशार असतात, असे जे म्हटले जाते त्याची प्रचिती कॉपीमुक्तीच्या कडक वातावरणातही कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करण्यातून दिसून आली. म्हणजे अशा प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी कठोर उपायांचीच गरज आहे.

जळगावचे जिल्हाधिकारी अमन मित्तल (Aman Mittal) यांनी बारावी परीक्षा सुरू होण्याच्या आठ दिवस आधीपासून जिल्हा कॉपीमुक्त परीक्षा मोहीम राबवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तसेच मुख्याध्यापक आणि संस्था चालकांच्या बैठका घेऊन बारावी आणि दहावीच्या परीक्षा कॉपीमुक्त घेण्याच्या संदर्भात सूचना दिल्या. कॉपी झाली असे निदर्शनास आले तर त्या केंद्राचे मुख्याध्यापक आणि संचालक यांचेवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड दम दिला होता. त्यामुळेच बारावीच्या इंग्रजी पेपरची परीक्षा जिल्ह्यात कॉपीमुक्त झाली. जिल्हा प्रशासनाच्या या कॉपीमुक्त परीक्षा मोहिमेमुळे आतापर्यंत ज्या काही कॉपीबद्दल चर्चा होती, अथवा कॉपींचा सुळसुळाट होता, तो प्रकार मोडीत निघाला आहे. मंगळवारी बारावी इंग्रजीच्या पेपरची परीक्षा होती. सकाळी नऊ वाजेपासूनच विद्यार्थ्यांची केंद्रात प्रवेश घेण्यासाठी रांग लागलेली दिसून आली. कारण परीक्षार्थी प्रत्येक विद्यार्थ्यांची अंग झडती घेऊन त्याला केंद्रात प्रवेश दिला जात होता. त्यामुळे कोठेही लपून छपून परीक्षा केंद्रात कॉपी नेण्याच्या प्रकाराला आपोआप ब्रेक लागला. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या अंग झडतीच्या वेळी त्याचे जवळ कॉफी सदृश्य प्रकार सापडला की त्याच्यावर कारवाई करण्यात येते. कारवाईच्या भीतीपोटी परीक्षार्थी विद्यार्थ्यांकडून सोबत कसलेही कागदाचे चीटूर सुद्धा बाळगले जात नाही. ५० टक्के अंग झडतीमुळे कॉपीला ब्रेक लागला.

परीक्षा केंद्राच्या ५० मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू केल्याने कॉपी पुरवणाऱ्या बहाद्दरांना परीक्षा केंद्र परिसरात फिरताच येत नाही. कॉफी पुरवणाऱ्यांवर ब्रेक लागला. परीक्षा केंद्र परिसरातील सर्व झेरॉक्स मशीन केंद्र बंद ठेवण्यात आल्याने कॉपीची झेरॉक्स करणे शक्य झाले नाही. परीक्षा केंद्रात परीक्षा सुरू होतात मुख्य गेट बंद करून घेण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या होत्या, आणि गेटवर पहारेकरी नेमण्यात आले होते. त्यामुळे बाहेरील कोणासही गेटमधून प्रवेश दिला जात नसल्याने येथेही कॉपीला ब्रेक लागला. त्यानंतर फिरते पथक अचानक परीक्षा केंद्राला भेटी देऊन जात असल्याने एक प्रकारे केंद्रातील हॉलवर नियंत्रण करणाऱ्यांवर दबाव होता. त्यामुळे गैरप्रकाराला आळा बसला. जिल्हा प्रशासनाने बारावी परीक्षा कॉपीमुक्त मोहीम यशस्वीपणे राबविल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. ही मोहीम अशाच प्रकारे चालू ठेवली तर कॉपी शिवाय परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची मानसिकता तयार होऊन अभ्यास करण्याचा त्यांचा कल वाढेल एवढे मात्र निश्चित.

जळगाव जिल्ह्यातील बारावीच्या परीक्षा या ४७ केंद्रांवर सुरू असून सुमारे ४४ हजार विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. विना कॉपी परीक्षा झाल्यामुळे दहा टक्के निकाल कमी लागण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. निकाल थोडा कमी लागला तरी हरकत नाही, कारण अभ्यास करण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागेल. अभ्यास न करता कॉपी करून आपण परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो, ही प्रवृत्ती सुद्धा आपोआप थांबणार आहे. त्याचा खराखुरा फायदा दहावी बारावी परीक्षा देऊन उत्तीर्ण विद्यार्थ्यांनाच होणार आहे. कालच्या इंग्रजीचा पेपरला मोठ्या प्रमाणात होणारी कॉपी झाली नाही, हे कॉपीमुक्त परीक्षा मोहिमेचे यश म्हणता येईल. परंतु अलीकडे इंग्रजी आणि गणित या पेपराबरोबरच इतर विषयांमध्येही कॉपी होते, असे प्रकार निदर्शनास आलेले आहेत. त्यामुळे सर्वच विषयांच्या पेपरला कॉपी होणार नाही, याची दक्षता प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली राहील. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कॉपीमुक्त मोहिमेला शुभेच्छा…!

Leave A Reply

Your email address will not be published.