मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं उभं पीक आडवं झालं असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. याचदरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अवकाळी पावसानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेती नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
अवकाळी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या ठिकाणी त्वरित पंचनामे करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याचबरोबर राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शासनाला प्रस्ताव सादर करा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवकाळीग्रस्त जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
काल कोसळलेल्या अवकाळी पावसाचा नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा यासहित इतर जिल्हांनाही तडाखा बसला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. तसेच शेतकऱ्यांची पिकेही जमीनदोस्त झाली आहेत.