साकळी येथे नागरिकांनी रस्त्यावर स्वखर्चातून टाकले गतिरोधक…

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

साकळी (Sakali) येथील शनि मंदिर (बाहेरपुरा) भागातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक नसल्याने रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे अपघात होऊ शकतो. ही गंभीर बाब लक्षात घेऊन या भागातील नागरिकांनी स्वखर्चातून या रस्त्यावर गतिरोधक तयार करून एक वेगळ्या प्रकारची सामाजिक बांधिलकी जपली आहे. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी संबंधित रहिवाशांनी साकळी ग्रामपंचायत प्रशासनास लेखी निवेदन दिले आहे.

लेखी निवेदनुसार, साकळी येथील शनिमंदिर भागातून जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या काही महिन्यांपूर्वी काँक्रिटीकरण करण्यात आलेले आहे. यामुळे रस्ता सुरळीत झाल्यामुळे या रस्त्यावरून सर्व प्रकारच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते. या वाहनांच्या वर्दळीत काही वाहने सुसाट वेगाने धावत असतात व यामुळे या भागातील रहिवासी असलेल्या लहान मुलांना आबाल वृद्ध,महिला या सर्व ग्रामस्थांच्या या रस्त्यावरून वापरणे जिकरीचे बनले आहे. यामुळे नागरिकांच्या जिवास धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे या रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावे, गतिरोधक टाकण्याची व्यवस्था लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे. सदर निवेदन सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांनाही देण्यात येणार आहे.

सदर निवेदनावर त्या-त्या विभागाकडून कारवाई होईल तेव्हा होईल मात्र सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन तसेच संबंधित समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन या भागातील रहिवाशी नागरिकांनी लोकवर्गणी जमा करून स्वखर्चाने या रस्त्यावर दोन ठिकाणी गतिरोधक बांधून घेतले आहे. या सामाजिक कार्यासाठी नूतन विकासोचे माजी चेअरमन सूर्यभान बडगुजर, ग्रामपंचायत सदस्य साहेबराव बडगुजर, महेंद्र वसंत बडगुजर यांचेसह या भागातील सर्व रहिवाशी नागरिकांनी गतिरोधक बांधकामासाठी लागणारे पैसे जमवून आर्थिक सहकार्य केले आहे. सर्वांच्या सहकार्यातून झालेल्या या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर रस्त्यावर गतिरोधक टाकल्यामुळे निश्चितच सुसाट धावणाऱ्या वाहनांचा आपोआपच वेग कमी होऊन या रस्त्यावरील अपघात टाळण्यास मदत होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.