१८ वर्षीय युवा बुद्धिबळपटू प्रज्ञानंद पराभूत… त्याचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारताचा युवा बुद्धिबळपटू रमेशबाबू प्रज्ञानंदला फिडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने टायब्रेकरमध्ये प्रज्ञानंदला 1.5-0.5 च्या फरकाने पराभूत केले होते. पहिल्या गेममध्ये पराभूत झाल्यानंतर प्रज्ञानंदला पुनरागमन करण्यात अपयश आले.

दोन्ही खेळाडूंनी अंतिम फेरीत शास्त्रीय फेरीचे दोन्ही गेम अनिर्णित ठेवले होते. त्यामुळेच त्यांच्यात टायब्रेकर सामना झाला. प्रज्ञानंदने कार्लसनला हरवले असते तर 21 वर्षांनंतर भारतीयाला हे विजेतेपद मिळाले असते. पण तसे झाले नाही. यापूर्वी विश्वनाथन आनंदने 2002 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. तेव्हा प्रज्ञानंदचा जन्मही झाला नव्हता.

प्रज्ञानंद याचा जन्म 10 ऑगस्ट 2005 रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील स्टेट कॉर्पोरेशन बँकेत काम करतात, तर आई नागलक्ष्मी गृहिणी आहेत. त्याला एक मोठी बहीण वैशाली असून तीही बुद्धिबळ खेळते. वयाच्या 7 व्या वर्षी जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर प्रज्ञानंदचे नाव प्रथम प्रकाशझोतात आले. त्यानंतर त्याला फेडरेशन इंटरनॅशनल डेस इचेक्स मास्टर ही पदवी मिळाली.

वयाच्या 12 व्या वर्षी तो ग्रँडमास्टर झाला आणि विजेतेपद मिळवणारा सर्वात तरुण भारतीय ठरला. या प्रकारात प्रज्ञानंदने भारताचा दिग्गज बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदचा विक्रम मोडला. यापूर्वी 2016 मध्ये यंगेस्ट इंटरनॅशनल मास्टर होण्याचा मानही त्याने पटकावला होता. तेव्हा तो फक्त 10 वर्षांचा होता. ग्रँडमास्टर हे बुद्धिबळातील सर्वोच्च खेळाडू आहेत. या खालची श्रेणी आंतरराष्ट्रीय मास्टरची आहे.

प्रज्ञानंदांच्या यशामागे आईचा मोठा हात आहे. त्याची सर्व काळजी आईच घेते. मग ते जेवण असो की ट्रेनिंग. प्रज्ञानंदची आई सतत त्याच्यासोबत असते. तो जिथे खेळायला जातात तिथे आई सोबत जाते. कुठेही जाताना ते प्रेशर कुकर सोबत नेतात. म्हणजे परदेशातही मुलाला घरचे जेवण खाऊ घालता येईल, याचा विचार त्या करतात.

प्रज्ञानंद सामना खेळत असताना त्या हॉलमधील कोचवर शांतपणे बसलेल्या असतात. फायनलच्या दुसर्‍या क्लासिकल गेममध्ये कार्लसनला बरोबरीत रोखल्यानंतर, प्रज्ञानंदने आईबद्दल सांगितले- ‘मला माझ्या आईचा तसेच माझ्या बहिणीचा मोठा आधार आहे.’

या तरुण बुद्धिबळपटूने मोठी बहीण वैशाली आर हिच्याकडे पाहून कारकिर्दीची सुरुवात केली. वैशालीही बुद्धिबळ खेळते. वयाच्या 5 व्या वर्षापासून ती बुद्धिबळ खेळत आहे. वैशाली ही महिला ग्रँडमास्टर देखील आहे.

ती एका मुलाखतीत सांगते- ‘जेव्हा मी 6 वर्षांची होते, तेव्हा मी खूप कार्टून बघायचे. मला टीव्हीपासून दूर ठेवण्यासाठी, माझ्या पालकांनी मला बुद्धिबळ आणि चित्रकलेच्या क्लासमध्ये टाकले.

बहिणीला बुद्धिबळ खेळताना पाहून प्रज्ञानंदही प्रेरित झाला आणि त्यांनी वयाच्या तिसऱ्या 3 व्या वर्षी बुद्धिबळ शिकण्यास सुरुवात केली. त्याने बुद्धिबळाचे कोणतेही प्रशिक्षण घेतले नाहीत आणि मोठ्या बहिणीकडून तो खेळायला शिकला.

Leave A Reply

Your email address will not be published.