श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांची अमृतगंगा

0

अभंग-32

तुमचे कृपे सिद्धी जावो

दुर्बुद्धि ते मना I
कदा नुपजो नारायणा II1II
आतां ऐसें करीं I
तुझे पाय चित्तीं धरीं II II
उपजला भाव I
तुमचे कृपे सिद्धी जावो II2II
तुका म्हणे आंता I
लाभ नाहीं या परता II3II

अभंग क्रमांक 3058

उत्तम प्रपंच करावा,लौकीक वाढवावा, समाजकारण करावे किंवा राजकारण करावे नाहीतर धर्मकारण करावे हा बुद्धीचा एक दृढ निश्चय मोठ्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या बाबतीत झालेला व ते तसेच घडले. याचे इतिहासात अनेक दाखले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, वि. दा. सावरकर अशी असंख्य नावे समोर येतात. चांगले काम करण्याची प्रेरणा ही सुबुद्धी असते.त्यामुळे ती व्यक्ती सुसंस्कृत गणली जाते. सुजाण नागरिकाची भूमिका मग समर्थपणे ती पेलू शकते. समाज, राष्ट्र व देशाच्या विकासाच्या जडणघडणीत फार मोलाचा वाटा या विभूतींचा असतो.

तितकेच किंबहुना काकणभर अधिकच समाजकार्य घडते ते संतांकडून. कारण मुळापासून व्यक्ती घडविण्याचे काम त्यांच्या हातून घडते. “अध्यात्मविद्या विद्यानाम” सर्व विद्येत अध्यात्मशास्त्र हे श्रेष्ठ गणले आहे. अतिशय सूक्ष्म बुद्धी, कुशाग्र बुद्धी, समंजस बुद्धी, सर्वसमावेशक बुद्धी व स्थिर बुद्धी या शास्त्रासाठी लागते. कारण हे शास्त्र केवळ पदवी मिळविण्यापुरते नाही जर केवळ बोलण्यापुरतेही नाही. अनुभूती व प्रचिती यात ते अनुस्यूत आहे. संतवचनाचा केवळ अभ्यास करून भागत नाही तर त्याचा भावार्थ लक्षात घेऊन मनन चिंतनाद्वारे आचरणात आणायचा भाग आहे. म्हणून बुद्धीला अस्थिर करणारे, फाटे फोडणारे, एक निश्चय होऊ न देणारे जबरदस्त मन त्याचा निश्चय सहज मोडून पाडते. म्हणून तर तुकोबाराय देवाकडे मागणे मागताना,” देवा तुझा विसर पडू देऊ नको, हेचि दान दे” असे म्हणताना आणखी एक मागण आवर्जून मागतात “दुर्बुद्धी ते मना I कदा नुपजो नारायणा I” अशी कळकळीची विनंतीच जणू करतात. तरुण वयात गीतेचा अभ्यास करावयाचा ठरविले की एक मन दृढ निश्चय करते व दुसरे मन म्हणते हे वय नाही थोडा अवकाश आहे नंतर बघू. न दिसणारीच दोन मन पण एखादी चांगली गोष्ट करण्यास प्रवृत्त होते व दुसरे टाळते. ज्याची शुध्दमती आहे ते श्रेयस स्वीकारतात.चंचल बुद्धीने काहीच साध्य होत नाही. परमार्थ करायचा तर अग्रबुद्धी लागते जी साधना करताना आपला निर्धार व निग्रह कायम ठेवते. तेलाची धार जशी सतत एकसारखे लागते तसेच नामस्मरण किंवा सोहम् मंत्राची जपमाळ जपावी लागते.”जळो हे शरीर I फुटो हे मस्तक I नामाचा गजर सोडू नये II” इतका निग्रह तुकोबारायांचा होता म्हणून तर गाथा आपण प्रमाण मानतो. प्रचिती विण जे बोलणे घडते ते कंटाळवाणे ठरते. भगवंताचे चरण ते कदापिही सोडत नाहीत. त्यांचा निर्धार डळमळीत नसतो.” एक धरला चित्ती I आम्ही रखुमाईचा पति I” हे जणु त्यांचे ब्रीद असते.” अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण” अशी त्यांची साधना दीर्घकाळ, निरंतर चालू असते. कधीकधी काय होऊ शकते. असे बारा वर्षे झाली नाम घेतोय पण मनाचा व्याप काय कमी होत नाही त्यामुळे आपण थोडे अस्वस्थ होतो. “देवावेगळे कोणी नाही I ऐसे बोलति सर्वही I परंतु त्यांची निष्ठा काही तैसेचि नसे II” आपण देहबुद्धीवर येतो. भाव कमी होऊ शकतो. काही काळापुरते हे होऊ शकते. म्हणून भगवंताला नेहमीच साद घालावी लागते. जशी द्रौपदीने शेवटी आर्ततेने कृष्णाला हाक मारली “कृष्णा धाव” व तो ‘जगद्गुरु’ धावून आला. भगवंताच्या कृपेशिवाय लौकिक काय किंवा पारलौकिक काय कुठलाही संकल्प पूर्णत्वास जात नाही. अगदी “चालते हे शरीर कोणाचिया सत्ते I कोण बोलवितो हरिविण I देखवी ऐकवी ऐक नारायण I तयाचे भजन चुकू नये” जास्त तर्क-वितर्क करायची काही गरज नसते हे सर्व मान्य आहे.

पण नरदेह लाभलेला आहे. उत्तम बुद्धिमत्ता आहे. पण हे कायम लक्षात असावे की “बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे I एका केशिराजे सकळ सिद्धी I” एका केशवाला शरण यावे. सद्गुरूंनाच शरण जावे. नाहीतर स्वदेशात मान्यता पावलेला आहे, विदेशात ही प्रसिद्ध आहे सदाचार एकदम चांगला आहे पण मन जर गुरुचरण सेवेसाठी रत नसेल तर त्याचा काय उपयोग? असा प्रश्न शंकराचार्य ही करतात. सद्गुरू पादसेवेन किंवा आत्मदर्शन हेच आपल्या जीवनाचे ध्येय असावे व त्यानुसार अखंडीत रघुरायाची भेट व्हावी यासाठी साधना चालूच ठेवावी. मनुष्य देह खुप पुण्याईने प्राप्त झालेला आहे. सर्वात उत्तम लाभ झालेला आहे. हरिनाम घेऊन सुखाची भंडारे आपण खुली करावीत. चोर मागे लागला तर आपण पुढे पळतो. तसेच हा काळ आपल्याला मागे लागलेला आहे. क्षणाक्षणाने आयुष्य कमी होते त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा आपण करून घ्यावा. जो विश्वंभर सगळ्या जगाचा सांभाळ करतो बाळासाठी आधीच दुधाची उत्पत्ती करून ठेवतो, वृक्षवल्ली तरुवरांसाठी प्रकाश पाणी दोन्ही देतो त्यामुळे अशा अनंताला नीट आठवलेच पाहिजे. यासाठी लोकांचे भय किंवा लाज वाटून काय उपयोग. त्याची तमा न बाळगता म्हणजे कोण काय म्हणेल इकडे अधिक लक्ष न देता नारायणाला भजत राहावे नाहीतर भक्ती शिवाय आयुष्य वाया जाईल व मग मात्र फार मोठा तोटा होईल. दुःखाचे डोंगर सोसावे लागतील. हिताचा विचार केला नाही व नामघोषही केला नाही मागील जन्मीचे भोग हे अनुभवण्यास येतील. उत्तम, मध्यम, कनिष्ठ भोगताना सारे समजेल. यमाच्या हाती देताना अंगावरची सारी भूषणे काढून घेतील म्हणून आमची बुद्धी स्थिर ठेवावी. विषयांचा हव्यास आम्हाला वाटू नये आणि भाव इतका अंतकरण पूर्वक शेवटपर्यंत असावा की भगवंताच्या गोडीत एवढेही अंतर पडू नये व शेवटी ही तितकाच गोड व्हावा आणि यासाठी सारे प्रयत्न हाच खरा लाभ.

श्रीकृष्ण शरणं मम् 🙏

लेखिका- भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे.

Leave A Reply

Your email address will not be published.