गोदावरी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता करण्यात आली. मराठामोळा दिग्दर्शक निखिल महाजनला गोदावरी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे. तर अल्लू अर्जुनला पुष्पा या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर आलिया भट्ट आणि क्रिती सेनन यांना अनुक्रमे गंगूबाई काठियावाडी आणि मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून मिळाला.

रॉकेट्री: द नंबी इफेक्टला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. सरदार उधम हा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला आहे, तर एकदा काय झाले हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. अभिनेत्री पल्लवी जोशीला द काश्मीर फाइल्ससाठी तर पंकज त्रिपाठीला मिमीसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहेत, जे देशभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मिती प्रतिभेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी जाहीर केले जातात. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाच्या मते, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे उद्दिष्ट “सौंदर्य आणि तांत्रिक उत्कृष्टता आणि सामाजिक प्रासंगिकतेच्या चित्रपटांच्या निर्मितीला प्रोत्साहन देणे आहे.

हे पुरस्कार पहिल्यांदा 1954 मध्ये देण्यात आले आणि ते ‘स्टेट पुरस्कार’ म्हणून ओळखले जायचे. त्यावेळी विविध प्रादेशिक भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांनाच मान्यता आणि पुरस्कार दिले जात होते. चित्रपटांवर काम करणारे अभिनेते आणि तंत्रज्ञ यांना प्रथम पुरस्कार 1967 मध्ये देण्यात आला. नर्गिस ही ‘रात और दिन’ मधील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकणारी पहिली अभिनेत्री होती. उत्तम कुमारला त्याच वर्षी अँटनी फिरंगी आणि चिरियाखानासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

Leave A Reply

Your email address will not be published.