आमदार चंद्रकांत पाटील भाजपाच्या वाटेवर?

मुक्ताईनगर मतदारसंघ : खडसेंना शह देण्याची खेळी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय जनता पक्ष राज्यासह जिल्ह्यातही जोरदार धक्कातंत्राचा वापर करीत असून अन्य पक्षातील मातब्बरांना गळाला लावण्यासाठी मोठी खेळी खेळत असून मुक्ताईनगर मतदारासंघाचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांना भाजपात दाखल करुन घेण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्याला चंद्रकांत पाटील हे देखील प्रतिसाद देतील अशी स्थिती आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना शह देण्याची प्रत्येक संधी साधली जात असून, आता चंद्रकांत पाटील यांना भाजपात घेवून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला असून तेथे पक्षाकडे एकनाथराव खडसे यांना टक्कर देणारा उमेदवार नसल्याने ते उमेदवाराच्या शोधात आहेत. विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे अपक्ष असल्याने त्यांना भाजप प्रवेश मिळण्यास अडचण येणार नाही. खडसे आणि पाटील यांचे मतभेद जगजाहीर असल्याने त्याचा फायदा भाजपा उठविण्याच्या तयारीत आहे.

गिरीष महाजनांची वक्रदृष्टी
एकनाथराव खडसे यांनी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांच्यावर तोंडसुख घेतले असून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला; त्याला गिरीश महाजन यांनीही जोरदार प्रतिकार करीत खडसेंच्या अडचणी वाढविल्या आहेत. जिल्हा दूध संघातील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी गिरीश महाजन यांनी खडसेंना चांगलेच कोंडीत आणले असून आता खडसेंच्या होमपिचवरच गिरीश महाजन बॅटींग करीत असून आ. चंद्रकांत पाटील यांना गळाला लावत आहेत.

शिंदे सेनेची ताकद नाही!
अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा मतदारसंघात दबदबा आहे. सध्या ते शिंदेसेनेसोबत असले तरी मुक्ताईनगर मतदारसंघात शिंदेसेनेची ताकद नसल्याने आ. पाटीलही द्विधा मन:स्थितीत आहे.

भाजपाचे जोरदार संघटन
मुक्तार्इनगर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे संघटन उत्कृष्ठ असून पक्षाकडे लोकसभेचे प्रतिनिधीत्व आहे. स्थानिक स्वराज्य संस्थावर भाजपाचा कब्जा असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोठे नेटवर्क तेथे कार्यरत आहे. याचा फायदा आ. पाटील घेण्याचा तयारीत आहे.

मी शिंदेंसोबत :- आ. चंद्रकांत पाटील
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मी त्यांच्यासोबत आहे. काही लोक जाणून-बुजून अशी माहिती देत आहेत. खडसे लोकसभेचे उमेदवार असू शकतात, माझी त्यांची लढत होणार नाही. मी एकनाथ शिंदेंसोबत कायम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.