भाजपच्या निष्ठावंतांमध्ये असंतोष खदखदतोय?

0

 

लोकशाही संपादकीय लेख

 

लोकसभा निवडणुकांचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्या आधी सर्वच राजकीय पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. एक महिन्यानंतर लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी महाराष्ट्रातील भाजपमध्ये इतर पक्षातील नेत्यांच्या प्रवेशाचे विशेषतः काँग्रेस पक्षातील नेत्यांचे भाजपमध्ये होणारे इनकमिंग पाहता महाराष्ट्रात एकमेव काँग्रेस पक्षात फूट पडली नव्हती, त्या काँग्रेस पक्षात सुद्धा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रवेशामुळे फूट पडली आहे. महाराष्ट्रातील शिवसेना राष्ट्रवादी पक्षातील फुटी नंतर काँग्रेस सुद्धा कमकुवत झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेस पक्षाचे नेते स्वतंत्र गट सत्ताधाऱ्यांसोबत जाऊन स्थापन न करता त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता महाराष्ट्रात भाजप, शिंदे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि इतर महायुतीच्या विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि काँग्रेस व इतर मित्र पक्षाच्या महाविकास आघाडीमध्ये सरळ सरळ सामना होणार आहे. याचाच अर्थ भाजप स्वतःच्या ताकदीवर स्वतंत्रपणे लोकसभेच्या निवडणुका लढवू इच्छित नाही. कारण लोकसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या सर्वेक्षणात मतदारांचा कल हा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकला असल्याने भाजप स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याऐवजी महायुती सोबतच युती करीत असल्याचे दिसून येते. शिवसेनेतील फूट, राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुट यामध्ये त्या त्या पक्षातील नेत्यांची मजबुरी असल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना तो निर्णय घेणे अपरिहार्य होते, असे बोलले जातेय. त्याचबरोबर आता काँग्रेस मधील माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, शेंदुर्णीचे राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सुद्धा भाजपात का प्रवेश केला? हे नव्याने सांगण्याची गरज नाही. कारण अजित पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे काही मंत्री आणि आमदार हे भाजपच्या रडारवर होते. भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीने भाजपबरोबर सत्तेत सामील झाले, तो प्रकार सर्वसामान्य कार्यकर्त्याला तसेच मतदारांना पडलेला नाही. विशेष म्हणजे गेल्या दहा वर्षापासून भाजपची केंद्रात सत्ता आहे. भाजप हा साधन सुचिता पाळणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष धुमसत असल्याचे चित्र दिसून येते.

 

गेल्या अनेक वर्षापासून भाजपच्या विरोधात लढणाऱ्या माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांची कन्या डॉ. केतकी पाटील यांचा भाजपात झालेला प्रवेश जळगाव जिल्ह्यातील विशेषतः रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या निष्ठावंतांना पसंत पडलेला नाही. केवळ पक्षशिस्तेमुळे भाजपचे निष्ठावंत त्याला जाहीर विरोध दर्शवीत नाहीत. कारण रावेर लोकसभा मतदारसंघात गेल्या चार टर्मपासून भाजपचा खासदार निवडून येतोय. माजी खासदार कै. हरिभाऊ जावळे यांना २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर झालेले तिकीट विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना भाजपच्या उमेदवारी देण्यात आले. कै. हरिभाऊ जावळे यांच्यावर फार मोठा अन्याय पक्षाने केला होता. कै. हरिभाऊ जावळे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये फार मोठी नाराजी पसरली होती. तरीपण मोदी लाटेमध्ये रक्षा खडसे २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या फरकाने निवडून आल्या. रक्षा खडसे या मूळ भाजपच्या असल्याने भाजप कार्यकर्त्यांना विशेष नाराजी नव्हती. परंतु आता जर काँग्रेस मधून नव्याने भाजपात आलेल्यांना रावेर लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिल्यास मूळ भाजपमधील निष्ठावंतांची फार मोठी नाराजी ओढावणार आहे. तशी खरखर कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतेय. त्यामुळे भाजपच्या निष्ठावंतांना पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी ओढावणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यावल रावेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांनी “मी काँग्रेस सोडणार नाही. मी काँग्रेसमध्येच राहणार..” असे वक्तव्य केल्याने त्यांच्या भाजप प्रवेशावर पडदा पडला आहे. आता रावेरचे उद्योजक श्रीराम पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित होणार असल्याची चर्चा आहे. सध्या श्रीराम पाटील हे कोणत्याही पक्षाचे नसल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाला भाजपातील निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून विशेष विरोध होणार नाही. कारण त्यांनी यावल रावेर तालुक्यातील विकासासाठी आपण येती विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सहा महिन्यापूर्वीच त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून घोषणा केली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे घोडा मैदान जवळ आहे. बघूया काय होते ते…!

Leave A Reply

Your email address will not be published.