लोकशाही न्यूज नेटवर्क
हैदराबादः ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी हैदराबादमध्ये एका व्यापाऱ्याने चक्क 101 बकऱ्यांची कुर्बानी दिली.
यावेळी ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी उत्तर प्रदेशातल्या मेरठवरुन दिल्लीच्या जात असताना ओवेसी यांच्यावर दोन पिस्तुलधाऱ्या हल्लेखोरांनी फायरिंग केली. त्यात ओवेसी थोडक्यात बचावले, पण त्यांच्या गाडीची गोळ्यांनी चाळणी झाल्याचे समोर आले. खुद्द ओवेसींनीही त्यांच्या गाडीची काय स्थिती झाली त्याचे फोटो ट्विट केले होते. पोलिसांनी त्यानंतर दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले. केंद्र सरकारने त्यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली. मात्र, त्यांनी ती नाकारत उत्तर प्रदेश, केंद्र तसेच निवडणूक आयोगाने ह्या हल्ल्याची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी केलीय.
ओवेसींवरील हल्ल्या प्रकरणी आतापर्यंत दोन जणांना अटक करण्यात आलीय. सचिन आणि शुभम अशी त्याची नावे आहेत. पण ते कुणाशी संबधीत आहेत, काय करतात, कुठल्या पक्षाचे काम करतात याची माहिती अजून देण्यात आलेली नाही. यातला एक आरोपी आधी घटनास्थळावरुन फरार झाला तर दुसरा मात्र स्वत: पोलिसात जाऊन शरण आला. ओवेसींच्या म्हणण्यानुसार चार एक हल्लेखोर होते. असे असेल तर मग त्या सर्वांचा शोध घेण्यासाठी यूपी पोलीसांनी चार पथके तयार केली आहेत. दोन आरोपींना पकडल्याची माहिती मेरठचे एसपी दीपक भूकर यांनी दिलीय. इतरांचा शोध सुरू आहे.
ऐन निवडणुकीच्या आधी ओवेसीवर झालेल्या गोळीबाराने राजकारण तापले आहे. दुसरीकडे ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या समर्थकांनी प्रार्थना केल्या आहेत. हैदराबादमध्ये एका व्यापाऱ्याने चक्क एकशे एक बऱ्यांची कुर्बानी दिली. यावेळी आमदार आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे नेते अहमद बलाला यांचीही उपस्थिती होती. दरम्यान, 3 फेब्रुवारी रोजीही ओवेसी यांच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या समर्थकांनी प्रार्थना केली होती.
उत्तर प्रदेशात ओवेसींवर झालेल्या हल्ल्यावरून राजकारण सुरू झाले आहे. येणाऱ्या काळात ते पेटणार आहे. मतांच्या ध्रुवीकरणासाठी हा हल्ला घडवून आणला गेला, असा आरोप केला जात आहे. मात्र, पोलीस तपासात याचे दूध का दूध आणि पानी का पानी होणार का, याची उत्सुकता आहे.