सराफ व्यापार्‍याची निर्घृण हत्या, दागिन्यांची बॅग लंपास

0

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क 

तिवसा येथील त्रिमूर्ती नगरमध्ये जुन्या स्टेट बँकेच्या इमारतीसमोर राहणाऱ्या सुवर्णकाराच्या घरात घुसून निर्घृण हत्या केल्याची घटना 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजताच्या सुमारास घडली. संजय भगवंतराव मांडळे (वय 55 वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या सुवर्णकाराचे नाव आहे.

संजय मांडळे यांचे तिवसा येथील सराफा लाईनमध्ये सुवर्णकारांचे दुकान आहे. ते पत्नी व मुलगा यांच्यासह त्रिमूर्ती नगर येथे राहत होते. त्यांच्या पत्नीला नियमित डायलिसिस करावे लागत असल्याने मुलगा वैशाख हा आईला घेऊन अमरावती येथे रुग्णालयात गेला होता. ते काही दिवसापासुन मानसिक अस्वस्थतेमुळे घरीच होते. सायंकाळच्या सुमारास घरी कुणीही नसताना अज्ञात मारेकर्‍याने वरच्या माळ्यावर राहत असलेल्या संजय मांडळे यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे संजय मांडळे हे जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात निपोचित पडले होते.

सायंकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास मांडळे यांच्या पत्नी व मुलगा अमरावती वरून घरी आल्यावर सदर घटना बघताच त्यांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच तिवसा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. दिवसा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहे.

दरम्यान मांडले यांची दागिने ठेवलेली बॅग त्यांच्या कुटुंबानी पाहली असता ती कुठेही दिसून आली नाही. त्यामुळे मारेकऱ्यांनी ती लंपास केल्याचा अंदाज व्यक्त करून सोने लुटण्यासाठीच हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज तिवसा पोलिसांनी वर्तवला आहे.  बॅगमध्ये किती सोने होते, मारेकऱ्यांनी लूट करण्यासाठी खून केला की अन्य काही कारण होते. याबाबत पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.