रावेर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी तरुणाचे आमरण उपोषण  

0

 

 

मोरगाव ता.रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

रावेर जि.जळगाव येथील रहिवासी प्रमोद उर्फ सावन मधुकर मेढे हा तरुण आजपासून रावेर तहसील कार्यालयासमोर रावेर पोलीस स्टेशनच्या विरोधात बेमुदत आमरण उपोषणास बसलेला आहे.  रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद व्हावेत म्हणून त्याने ही टोकाची भूमिका घेतलेली आहे.

या तरुणाने दिलेल्या अर्जामध्ये रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्यावर आरोप केलेले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार रावेर शहरामध्ये सट्टा व मटकाच्या तीन पिढ्या आहेत. अर्जात म्हटल्याप्रमाणे प्रत्येक पिढीकडून दर आठवड्याला 40000/- हजार रुपये पोलीस निरीक्षक घेतात. या अवैध धंद्यांपासून पोलीस निरीक्षक यांना महिन्याकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. म्हणून पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्यांकडे पोलीस मुद्दाम दुर्लक्ष करीत आहेत. असे सुद्धा अर्जात नमूद केले आहे.

या अगोदर देखील या तरुणाने दि.03/03/2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर केलेला आहे. परंतु अद्यापही त्या अर्जाची सुद्धा चौकशी झालेली नाही. तसेच या अवैध धंद्यामुळे लहान मुले महिला व तरुण पिढी यांचे आर्थिक नुकसान होत आहे असे या तरुणाचे म्हणणे आहे. रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांची खातेनिहाय चौकशी व्हावी. ही सुद्धा मागणी या तरुणाने आपल्या अर्जात केलेली आहे. तसेच अवैध धंदेवाले व पोलीस यांच्याकडून माझ्या जीवितास धोका आहे असे सुद्धा त्याने अर्जात नमूद केलेले आहे. या सर्व गोष्टींची दिनांक 27 नोव्हेंबर पर्यंत अवैध धंदे बंद न केल्यास दिनांक 28 /11 /2023 पासून धरणे आंदोलन करणार अशी विनंती केलेली आहे. त्याप्रमाणे आज पासून मी आमरण उपोषणास बसलेलो आहे. असे या तरुणाने दैनिक लोकशाही प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.