४ कोटी खंडणी : ॲड. प्रवीण चव्हाणांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

काय आहे प्रकरण ?

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात गाजलेल्या खटल्यातील माजी सरकारी वकीलावर चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. साक्षीदारला धमकी देऊन चार कोटी रुपयांची मागणी केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तुला जिवंत रहायचे असेल तर ॲड. प्रवीण चव्हाण यांना न्यायालयाच्या खर्चासाठी चार कोटी द्यावे लागतील, अशी धमकी दिली गेली. या प्रकरणी माजी सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण, त्यांचा पुत्र आणि इतर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १६ नोव्हेंबर रोजी आणि त्यापूर्वी एकदा हा प्रकार घडला होता.

ॲड. प्रवीण चव्हाण हे माजी सरकारी वकील आहे. माजी आमदार सुरेश जैन यांच्याविरोधातील घरकुल खटल्यात ते सरकारी वकील होते. त्यामुळे ते राज्यभरात प्रसिद्ध झाले. त्यांनी इतर मोठ्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याचा प्रयत्न केलाचा आरोप आहे. जळगावातील गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्या वादात ॲड. प्रवीण चव्हाण एका गटाच्या बाजूने होते. त्यामुळे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील पेन ड्राईव्ह बॉम्ब विधानसभेत मांडला होता. गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा कट असल्याचा आरोप फडवणीस यांनी विरोधी पक्षनेते असताना सभागृहात केला होता. या प्रकरणात तेजस मोरे हा साक्षीदार होता.

ॲड. प्रवीण चव्हाण यांनी तेजस मोरे यांना धमकवण्याचा प्रयत्न केला. सुमारे दीड महिन्यांपूर्वी तेजस मोरे मुंबईवरुन पुणे जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनास तिघांनी अडवले. तुला जिवंत रहायचे असेल तर ॲड. चव्हाण यांना न्यायालयाच्या खर्चासाठी चार कोटी दे, नाही तर तुला जिवे ठार मारले जाईल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर १६ नोव्हेंबर रोजी पुन्हा मोरे यांना अशीच धमकी देण्यात आली. यामुळे मोरे यांनी जळगाव येथील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून ॲड. प्रवीण चव्हाण, त्यांचा मुलगा अन्य तिघांवर भादंवि कलम ३२३, ३८७ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.