खुशखबर; इस्रोच्या सौर मोहिमेला मोठे यश; आदित्य L-1 ने पाठवली सूर्याची रंगबिरंगी छायाचित्रे…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या सौर मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. इस्रोच्या अवकाशयान आदित्य एल-1 वर बसवण्यात आलेल्या ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’ (SUIT) ने सूर्याची रंगीत छायाचित्रे पाठवली आहेत. या दुर्बिणीने ६ डिसेंबर रोजी सूर्याची ही छायाचित्रे घेतली.

सौर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपने प्रथमच सूर्याची फुल डिस्क छायाचित्रे घेतल्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली. ही चित्रे 200 ते 400 नॅनोमीटर तरंगलांबीची आहेत. यामध्ये सूर्य 11 वेगवेगळ्या रंगांमध्ये दिसतो. इस्रोने ही छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.

SUIT पेलोड 20 नोव्हेंबर 2023 रोजी लाँच झाला

आदित्य L-1 चा SUIT पेलोड 20 नोव्हेंबर 2023 रोजी लाँच करण्यात आला. या दुर्बिणीने सूर्याच्या पृष्ठभागावरील फोटोस्फियर आणि क्रोमोस्फियरची छायाचित्रे घेतली आहेत. क्रोमोस्फियर हा सूर्याचा पृष्ठभाग आणि बाह्य वातावरणातील कोरोना यांच्यामध्ये असलेला पातळ थर आहे. हा थर सूर्याच्या पृष्ठभागापासून २ हजार किमी वर आहे. या छायाचित्रांच्या मदतीने शास्त्रज्ञ सूर्याचा योग्य अभ्यास करू शकणार आहेत.

L1 पॉइंटमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2024 रोजी पूर्ण होईल

इस्रोचे ‘आदित्य L1’ अंतराळयान अंतिम टप्प्यात आले आहे आणि L1 पॉइंटमध्ये प्रवेश करण्याची प्रक्रिया 7 जानेवारी 2024 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. L1 पॉईंटमध्ये अंतराळयानाच्या प्रवेशाची अंतिम तयारी सातत्याने सुरू आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून ‘आदित्य L1’ 2 सप्टेंबर रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आले. इस्रोच्या मते, ‘आदित्य-एल1’ ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली अंतराळ-आधारित वेधशाळा आहे.

अंदाजे 15 लाख किलोमीटरचा प्रवास

125 दिवसांत पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर हे अंतराळयान लॅग्रॅन्गियन पॉइंट ‘L1’ भोवती प्रभामंडल कक्षेत ठेवले जाईल. ‘L1’ बिंदू सूर्याच्या सर्वात जवळचा मानला जातो. ‘आदित्य एल1’ सूर्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी विविध प्रकारचे वैज्ञानिक अभ्यास करेल आणि त्याची छायाचित्रे पृथ्वीवर विश्लेषणासाठी पाठवेल.

Leave A Reply

Your email address will not be published.