लाचखोर ग्रामसेवकासह ऑपरेटर एसीबीच्या जाळ्यात…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना यावल तालुक्यातील चुंचाळे गावातील ग्रामसेवक आणि डीटीपी ऑपरेटरला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगीहात पकडले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी रा.साकळी ता.यावल आणि ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी रा. चुंचाळे ता.यावल असे लाचखोर संशयित आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील चुंचाळे गावात राहणारे तक्रारदार यांच्या वडिलांच्या नावे एक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्याच्या योजनेसाठी केंद्र शासनाकडून २ लाख रुपये निधी मंजूर झाला होता. या मंजूर झालेल्या निधीतून ५० टक्के रक्कम म्हणजे १ लाख रुपयाची मागणी चुंचाळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी यांनी केली होती. यामुळे तक्रारदाराने शुक्रवारी १६ फेब्रुवारी रोजी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंध विभागात तक्रार दिली. दरम्यान विभागाने दिलेल्या तक्रारीच्या पडताळणीसाठी शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास सापळा रचला. ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी सांगण्यावरून ग्रामपंचायत ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी यांनी १ लाख रुपयांची रक्कम घेतली. तेवढ्यात जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने ऑपरेटरला पैसे घेताना रंगेहात पकडले. दरम्यान याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात भ्रष्टाचार्यांचे धाबे दणाणले आहे.

या कारवाई मध्ये पोलीस उपअधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अमोल वालझाडे, पोलीस निरीक्षक एन.एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.ना. बाळू मराठे, सुनिल वानखेडे, पो.ह.रविंद्र घुगे, मपोहेकॉ शैला धनगर ,पो.ना.किशोर महाजन,पो.कॉ. प्रदीप पोळ,पो.कॉ,पो. कॉ.प्रणेश ठाकुर, पो. कॉ. अमोल सूर्यवंशी यांनी कार्यवाही केली.

Leave A Reply

Your email address will not be published.