हैद्राबाद बलात्कार प्रकरण; अक्षय कुमार, सलमान खानसह 38 कलाकारांविरोधात तक्रार

0

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क 

हैदराबादमध्ये 2019 साली  एक बलात्काराचं धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. ज्यामध्ये 4 जणांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर नराधमांनी तिला जिवंत जाळलं होतं. या संतापजनक घटनेनं सर्वांना धक्का बसला होता. अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत निषेध नोंदवला होता. सामान्य लोकांसोबतच बॉलिवुडच्या कलाकारांनी देखील या घटनेबाबत दुःख आणि नाराजी व्यक्त केली होती.

पण पीडितेबद्दल दु: ख व्यक्त करताना काही सेलिब्रिटींनी पीडित मुलीची ओळख उघड केली होती. बलात्कार पीडित मुलीची ओळख उघड करणं हा कायद्यानं गुन्हा असल्यानं याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवभारत टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, अजय देवगण , अक्षय कुमार, सलमान खान,  रकुलप्रीत सिंग  यांच्यासह 38 भारतीय सेलिब्रिटींवर बलात्कार पीडितेची ओळख सोशल मीडियावर उघड केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कायद्यानुसार कोणत्याही बलात्कार पीडितेचं नाव, छायाचित्र किंवा खरी ओळख कुठेही उघड करणं हा गुन्हा आहे. दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिल्लीतील सबजी मंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 228A अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

तसेच याप्रकरणी तीस हजारी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आपल्या याचिकेत तक्रारदार वकिलानं म्हटलं की, सामान्यांसाठी उदाहरण बनण्याऐवजी भारतीय सेलिब्रिटी नियम मोडत आहेत. त्यांनी पीडितेची ओळख उघड केली आहे. संबंधित सर्व सेलिब्रिटींना तातडीनं अटक करण्यात यावं, अशी मागणी याचिकाकर्त्या वकीलानं केली आहे. त्यामुळे अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण सहित 38 कलाकारांवर अटकेती टांगती तलवार आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.