सुरगाणा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे शिक्षकांचा गौरव

0

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिक्षक हा समाज परिवर्तनाच्या चळवळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. निरागस बालमनावर संस्काराचे उत्तम पैलू पाडण्याचे काम शिक्षकच करु शकतो असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी शासकीय विश्रामगृह सुरगाणा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने  शिक्षक दिनाच्या निमित्ताने  शिक्षक गौरव  सोहळ्यात प्रसंगी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भागवत धुम होते. तर व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष चिंतामण गावित, युवक तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार,  राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष सुवर्णा गांगोडे, उपाध्यक्ष भारती भोये, सरचिटणीस जिजाऊ कोल्हे, राष्ट्रवादी शिक्षक सेलचे सेवानिवृत्त शिक्षक चिंतामण गायकवाड, नवसू गायकवाड, हरीभाऊ भोये, आनंदा झिरवाळ, रामदास केंगा आदिंसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

कळवण सुरगाणा विधानसभेचे आमदार नितीन पवार, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणादायी बलकवडे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्रीताई पवार यांनी कौतुक करीत भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

यावेळी गावित म्हणाले की, कोरोना काळात आदिवासी दुर्गम भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्याचे  शिक्षकांपुढे खुप मोठे आव्हान उभे ठाकले होते. कोरोनामुळे  ज्ञानमंदीराची कवाडे बंद करण्यात आली होती. अशा ही परिस्थितीत गोंधळून न जाता, आलेल्या अडचणींवर मात करत शिक्षकांनी शाळा बंद, शिक्षण सुरू. ओट्यावरची, पारावर, मंदिराच्या आवारात, काहींनी तर झाडाखाली विद्यार्थ्यांना बसवून शिक्षण सुरू ठेवले. मुलांना ऑनलाइन शिक्षण देता येणे शक्य नव्हते.  त्यामुळे ऑफलाईन शिकवणीचे वर्ग भरवून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी रिड टु रुम असे उपक्रम राबविण्यात आले. असे कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल आम्ही घेऊन शिक्षकांचा गौरव करण्यात येत आहे.

सुवर्णा गांगोडे  यांनी सांगितले की, शिक्षकांनी सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडविण्याचे कार्या बरोबरच कोरोना काळात आदिवासी  भागातील शिक्षकांनी आर्थिक योगदान देत सुरगाणा, पेठ, दिंडोरी, कळवण या तालुक्यातील शिक्षकांनी आरोग्यासाठी रुग्णालयात भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. तसेच सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेडची उभारणी लोकवर्गणीतून करण्यात आली. कोरोना काळात शिक्षकांनी केलेले काम खुपचं प्रेरणादायी असून  दिलेलं योगदान खुप महत्वाचे आहे.

यावेळी शिक्षक सोमनाथ पवार, मोतीराम भोये, रविंद्र गायकवाड,  शिवराम देशमुख, राना चौधरी,  सतिश इंगळे, रामदास भोये, प्रकाश पाडवी, अर्जून गावित आदी उपस्थित होते. तालुक्यात  कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या  १० शिक्षकांचा गुलाबपुष्प, नारळ, शाल, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये  निलम साबळे, संजय बागुल, अविनाश धुम, सिताराम वळवी, इंदुबाई बागुल, संजय वाघ, दिपक अहिरे, रमेश आहेर, लक्ष्मण बागुल तसेच  कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावलेले शिक्षक रतन चौधरी आदींना सन्मानित करण्यात आले.

“आदिवासी भागात कोरोना काळात शिक्षकांनी केलेले कार्य हे वाखाणण्याजोगे तर आहेच परंतु रस्त्यावर उतरून राज्याच्या सीमेवर, गावाच्या चौफुलीवर स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केले आहे. आर्थिक योगदान देत ऑक्सिजन खाटा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी अनेक उपक्रमांच्या माध्यमातून शिक्षण सुरू ठेवले आहे. याचीच दखल घेत पाठीवर कौतुकाची थाप पडावी म्हणून आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे.”

 माजी सभापती सुवर्णा गांगोडे. पंचायत समिती सुरगाणा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.