राणेंचे डोके फिरल्याने त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात भरती करून शॉक द्यावा- ना. गुलाबराव पाटील

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपाहार्य विधान केल्याने राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रया देत म्हणाले की, नारायण राणे यांचे डोके फिरले असून त्यांना ठाण्याच्या रूग्णालयात भरती करून शॉक द्यावा.

राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अवमान केल्याचे प्रकरण आता प्रचंड वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. यावरून महाड, नाशिक आणि पुणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली. यानंतर नाशिक पोलिसांकडून नाारायण राणे यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे.

म्हणून विविध शिवसेना नेत्यांनी राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही त्यांना लक्ष्य केले आहे. टिव्ही नाईन या वृत्तवाहिनीशी बोलतांना ना. पाटील म्हणाले की, नारायण राणे यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केलं पाहिजे. एक केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्र्यांनी ही पदं भोगली आहेत, या पदाची गरिमा त्यांना माहिती आहे. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा तो संपूर्ण राज्याचा असतो. राज्याच्या मुख्यमंत्र्याबाबत आपण काय बोलावं याचं भान असलं पाहिजे. जर ते नसेल तर त्यांना रुग्णालयात दाखल केलं पाहिजे आणि वेळ आली तर शॉकदेखील दिला पाहिजे, अशी घणाघाती टीका ना. गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

तसेच यावर ना. पाटील म्हणाले की, नारायण राणे, शरद पवार, विलासराव देशमुख मुख्यमंत्रीपदी असतानाही राज्यात विरोधी पक्षनेते होते. पण त्यांची एक गरिमा होती. पण सध्या गरिमा नसलेलं भूत आलं आहे. यांच्या अंगात भूत घुसलं आहे का असं वाटतं. त्यांना भानूमतीच्या एखाद्या भक्ताकडे नेऊन अंगात काय घुसलं आहे पाहिलं पाहिजे, असे नमूद करत नारायण राणे हे माफी मागण्याच्याही लायकीचे नाहीत असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.