राज्यपालांविषयी मी काय बोलावं.. ? पवारांचा खोचक सवाल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र राज्‍यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तसेच उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार हे प्रथमच जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी अजित पवार यांनी जिल्‍ह्यात विविध कामांचा शुभारंभ केला. तसेच यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

राज्यपालांवर मी काय बोलू.. ?

याप्रसंगी विधान परिषदेच्या 12 जागांचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नियुक्तीचा प्रश्न कित्येक महिन्यांपासून प्रलंबित आहे. या प्रश्नावर उत्तर देतांना पवार म्हणाले की, वेळोवेळी आमच्या राज्यपाल साहेबांना सांगितलं जातंय. परंतु कॅबिनेटने ११७ आमदारांनी पाठींबा असलेली यादी दिलेली आहे, मात्र अजूनही त्यावर काही निर्णय झालेला नाहीय. ही देखील वस्तुस्थिती खरी आहे. कधीतरी राज्यपाल साहेबांना वाटेल की, आता अती झालेलं आहे तेव्हा निर्णय घेतील असं वाटतंय. आता तर पत्रकार परिषदेमध्ये मला याबाबत विचारलं जातंय, यावर मी काय बोलू असा प्रश्न मला पडतो. यावर मी काहीच बोलू शकत नाही. तुम्हीच सांगा आता मी काय बोलू ?

 शिवसेना-  भाजपमध्ये संबंध ताणले गेले 

12 सदस्यांच्या नियुक्तीच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप या पक्षांमधील संबंध ताणले गेले.  यावर राज्यपालांनी किती वेळेत याचा निर्णय घ्यावा यावर कायद्यात तरतूद नाही. मात्र राज्यसरकारच्या मंत्रिमंडळात एखादा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी देणं हे राज्यपालांचं काम असतं. हे त्यांना बंधनकारक आहे अशी कायद्यात तरतूद आहे.

अद्यापही प्रस्ताव प्रलंबित; कोर्टाने फटकारले

गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यपालांकडे हा प्रस्ताव प्रलंबित असल्याने हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान काही दिवसांपूर्वी कोर्टाने राज्यपालांना याबाबत खडसावले होते. राज्यपालांना कोर्ट आदेश देऊ शकत नाही. राज्यपालांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा अधिकार आहे, त्यात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही पण निर्णय घ्यावा लागेल, तो मुद्दा प्रलंबित ठेवता येणार नाही, या शब्दात कोर्टाने फटकारले होते.

खडसेंचे नाव असल्याची चर्चा

या १२ नावांमध्ये एकनाथ खडसे यांचे नाव आहे की नाही याबाबत अजूनही माहिती मिळालेली नसल्याने एकनाथ खडसेंचे काय होणार अशी देखील चर्चा होतांना दिसत आहे.  विधानपरिषद आमदार नियुक्ती मुद्द्यावरून राज्यपाल कोश्यारी आणि महाविकास आघाडी यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद नेमका काय आहे याची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून एकनाथ खडसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शे्ट्टी यांची नावे दिली आहेत. हे दोघेही नेहमी  भाजपवर सडकून टीका करत असतात.

तसेच एकनाथ खडसे यांच्या नियुक्तीला भाजपमधूनच मोठा विरोध आहे. एकनाथ खडसे यांना विधानसभेला तिकिट नाकारण्यात केंद्रीय नेतृत्वाची मोठी भूमिका होती. त्यामुळे आता त्यांच्या नावाला मंजुरी कशी द्यायची याबबत भाजपमध्ये मोठी रणनीती सुरू आहे. एकनाथ खडसे यांना आमदारकी देणे म्हणजे सभागृहात दोन पावले माघार आल्यासारखे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.