३३ नगरसेवकांचा पाठींबा; भगत बालाणींचे आयुक्तांना पत्र

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

१३ ऑक्टोबर रोजी महापालिकेची महासभा आयोजीत करण्यात आलेली आहे. यात स्थायी समिती सभापती, या समितीचे सदस्य आदींची निवड होणार आहे. या अनुषंगाने राजकीय घडामोडींचे वारे वाहू लागले आहे. भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून आपल्याला ३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचे पत्र भगत बालाणी यांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.

काही दिवसांपूर्वीच भाजपच्या तीन बंडखोर सदस्यांनी घरवापसी केली. यानंतर आता गटनेतेपदाबाबतची घडामोडी समोर आल्या आहेत. भगत बालाणी यांनी आपण स्वत: गटनेता तर राजेंद्र पाटील हे उपगटनेता असल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना दिले असून यात आपल्याला ३३ नगरसेवकांचा पाठींबा असल्याचा दावा केला आहे.

जळगाव शहर महापालिका महापौर, उपमहापौर निवडीच्यावेळी बंडखोरी करून २७ नगरसेवकांनी भाजपच्या महापौर व उपमहापौर यांना मतदान न कराता शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करून पक्षादेश झुगारून मतदान केले आहे. याबाबत आपल्याकडे या २७ नगरसेवकांच्या विरोधात अपात्रतेचे अपिल दाखल आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

या बंडखोर नगरसेवकांनी मीटिंग घेतल्याचा बनाव करून भाजप गटनेता व उपगटनेता बदलाबाबतचे पत्र महापौर यांना दिले व महापौरांनी प्रशासनाच्या माध्यमातून आपल्या कार्यालयाकडे पाठवले आहे; पण ते ग्राह्य धरू नये असे बालाणी यांनी दिलेल्या पत्रात नमूद केलेले आहे. तर, दुसरीकडे विभागीय आयुक्तांनी भाजपच्या २७ सदस्यांना अपात्र का करू नये अशा आशयाच्या नोटीसा बजावल्या आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.