बंडखोरीतून भाजपचा जिल्ह्यात शत-प्रतिशत चा डाव?

1

जळगाव (धों.ज.गुरव) – विधानसभा निवडणूक प्रचाराची रणधुमाणी अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. जळगाव जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेनंतर जिल्हाभरात निवडणूक प्रचाराचा जोर वाढला आहे. प्रचार रॅली, जाहीर सभा, कॉर्नर सभा आणि घरोघरी गाठीभेटी यावर प्रत्येक पक्षाचे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा भर दिसून येतोय. जळगाव जिल्ह्यातील एकूण 11 जागांपैकी 7 जागा भाजपच्या वाट्याला तर 4 जागांवर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार लढत आहेत. भाजप – सेनेच्या झालेल्या युतीनुसार युती धर्म जिल्ह्यात पाळला गेला असला तरी शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात भाजपच्या उमेदवारांनी केलेल्या बंडखोरीला जणू भाजपाचा अधिकृत पाठिबा असल्यच्या अविर्भावात  बंडखोर  पक्षाच्या नेत्यांच्या छायाचित्रांचा वापर करीत आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या जळगाव ग्रामीण, पाचोरा-भडगाव, एरंडोल – पारोळा आणि चोपडा या मतदारसंघात भाजपाच्या या बंडखोरांमुळे शिवसेनेच्या उमेदवारांना अडचणीत आडण्याचा प्रयत्न होतय. यूती धर्म पाळला गेला असता तर जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 11 जागा भाजपा सेना महायूतीला सहजरित्या मिळाल्या असत्या. शिवसेनेच्या चार जागा या भाजपा बंडखोरांमुळे जशा अडचणी निर्माण झाल्या तशाच पध्दतीचा प्रयत्न मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी केल्याने निर्माण झाला आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुरस्कृत केले गेल्यामुळे सर्व विरोधक एकत्र येवून भाजपाचे जेष्ठ नेते नाथाभाऊंना शह देण्यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघातील भाजपा उमेदवार सौ.रोहिणी खडसे यांचे समोरही आव्हान उभे केले गेले आहे. अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांना आणखी कुणाचा छुपा आशीर्वाद आहे हे मात्र निवडणूकीनंतरच स्पष्ट होईल. जिल्ह्यातील रावेर या मतदारसंघात भाजपाचे, विशेषत: गिरीश महाजन यांचे समर्थक म्हणविणारे भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी बंडखोरी करून निवडणूक लढवित आहेत. रावेर मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार हरिभाऊ जावळे यांची स्थिती डळमळीची असल्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेस आघाडीचे शिरिष मधूकरराव चौधरी यांना शह देण्यासाठी मताची मताची विभागणी व्हावी म्हणून अनिल चौधरी यांची बंडखोरी असल्याचे जाणकारांचे मत आहे. एकंदरीत जळगाव जिल्ह्यातील संपूर्ण 11 जागा बंडखोरीच्या सहकार्याने शतप्रतिशत आपल्याकडे ठेवण्याचा भाजपाचा यामागे डाव असल्याचा आता खुलेआमपणे सर्वत्र बोलले जात आहे.

जिल्ह्यातील शिवसेना उमेदवारांच्या विरोधात ज्या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यांचेवर अद्यापपर्यंत भाजपाकडून कसलीही कारवाई करण्यात आलेली नाही हे विशेष. जळगाव ग्रामीण मतदारसंघात शिवसेनेचे

गुलाबराव पाटील यांच्या विरोधात बंडखोरी करणारे चंद्रशेखर अत्तरदे हे भाजपाचे स्विकृत नगरसेवक आहेत. त्यांची पत्नी सौ.माधूरी अत्तरदे या जि.प.च्या सदस्य आहेत. तर आई जळगाव मनपात नगरसेविका आहे. पत्नी माधूरी अत्तरदे उघड उघड चंद्रशेखर अत्तरदे यांचा निवडणूक प्रचार करीत असतांना त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष पी.सी.पाटील हे अपक्ष श्री. अत्तरदेंचा प्रचार करतात आहेत. त्यांच्या संदर्भात भाजपाकडून अद्याप काहीच बोलले जात नाही. अशाच प्रकारे चोपडा मतदारसंघात शिवसेनेच्या लता सोनवणे यांच्याविरोधात जि.प.चे सभापती प्रभाकर गोटू सोनवणे यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवित आहेत. पाचोऱ्यात भाजपाचे नगरसेवक अमोल शिंदे तर एरंडोल मतदारसंघात सेनेचे चिमणराव पाटील यांच्याविरोधात पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांनी बंडखोरी केलेली आहे. शिवसेना उमेदवाराच्या विरोधात भाजपा पदाधिकाऱ्यांचे बंड तर रावेर मतदारसंघात अधिकृत भाजपा उमदेवाराच्या विरोधात भाजपाचे अनिल चौधरी यांनी बंडखोरी करून निवडणूक मैदानात उतरले आहेत. यासर्व बंडखोरांविरूध्द यूती धर्म भाजपाकडून कारवाई करणे अपेक्षीत असले तरी अद्याप त्यांचेवर कोणतीच कारवाई केली नसल्याने बंडखोरांचे फ ावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जळगाव येथे झालेल्या जाहीर सभेच्या ठिकाणी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांच्याकडे आपल्या संतप्त भावना व्यक्त करून नाराजी व्यक्त केली. पंतप्रधानांसमोर मला भाषण करण्याची संधी द्या अशी मागणी गुलाबरावांनी केली. त्याचा परिणाम त्यांना भाषण करण्याची संधी जरी दिली नसली तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जाहीर भाषणात जिल्ह्यातील भाजपा, सेनेच्या अधिकृत उमेदवारांनाच विजयी करण्याचे आवाहन करून बंडखोरांना थारा देवू नका असे आवाहन केले. परंतू त्यानंतर भाजपाकडून जे कारवाईचे शस्त्र उगारले पाहिजे होते ते उगारले गेले नसल्यामुळे भाजपाच्या मनात वेगळेच काही तरी शिजत आहे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात जिल्हा शिवसेना प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुखाकडे दिला असल्याने तेथे कारवाईचा प्रश्न येत नाही.

भाजपाचे संकटमोचक, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी अलीकडे बंडखोरांची खैर नाही असे जरी वक्तव्य केले असले तरी जो पर्यंत बंडखोरांवर प्रत्यक्ष कारवाईची कृती होत नाही तो पर्यंत अशा वक्तव्याला काहीही अर्थ उरत नाही. त्यामुळे बंडखोरांच्या विरोधात ठोस निर्णय घेतला नाही तर जिल्ह्यातील सर्व जागा शतप्रतिशत भाजपाकडे राहतील आणि तोच भाजपाचा छुपा डाव तर नाही ना? अशा प्रकारच्या शंका कुशंकांनी प्रत्येकाच्या मनात काहूर निर्माण केले आहे. निकालानंतर शिवसेनेच्या उमेदवाराला बंडखोरीमुळे फटका बसल्याचे निष्पन्न झाले तर भाजपा आणि शिवसेनेत भविष्यात युती असली तरी त्यांच्यातील संघर्ष अटळ आहे ऐवढे मात्र निश्चित.

1 Comment
  1. भागवतराव गुरव पत्रकार समाजतारा सम्पादक says

    श्री गुरव साहेबच्चे अभ्यासपूर्ण स्पॉट सवी स्तर निडणूक विश्लेषण। May be possible

Leave A Reply

Your email address will not be published.