चला मतदान करूया…आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावू !

0

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2019 ची तयारी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात अंतिम टप्प्यात आहे. जळगाव जिल्हा प्रशासनानेही विधानसभा निवडणूका निप:क्ष, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली कंबर कसली आहे. मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढावा, एक निकोप स्पर्धा होऊन बळकट लोकशाही निर्माण व्हावी, यासाठी जिल्ह्यातील निवडणूक विभाग प्रयत्नशील आहे. शहरापासून ते गाव, खेड्यापर्यंत मतदार जगजागृती करून सशक्त लोकशाहीसाठी सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन डॉ ढाकणे यांनी केले आहे. यासाठी जिल्ह्यात विविध नाविन्यपूर्ण जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. आजमितीस जिल्ह्यात 47 टक्के तरूण मतदार वर्ग आहे, त्यांनी मतदान केलेच पाहिजे, यासाठी जिल्हा प्रशासनासह केंद्रीय निवडणूक निरीक्षक महाविद्यालयांमध्ये जावून तरुणांशी संवाद साधत आहे. जिल्हा प्रशासनानेही 5 लाख विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरुन घेतले असून यामार्फत पालकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील चार मान्यवरांचे मतदान जनजागृतीसाठी जिल्ह्याचे आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या विविध उपक्रमांमुळे जिल्ह्यात यावेळी मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढेल, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ ढाकणे यांनी व्यक्त केला आहे.

जळगाव जिल्ह्यात 15 तालुके असून विधानसभेचे 11 मतदारसंघ आहे. यात चोपडा (अनुसूचित जमाती), रावेर, भुसावळ (अनुसूचित जाती), जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर या मतदार संघांचा समावेश आहे. निवडणुकीत होणाऱ्या प्रत्येक बाबींवर नजर ठेवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यात पाच सर्वसामान्य निरीक्षक, पाच खर्च निरीक्षक आणि एक पोलीस निरीक्षक याप्रमाणे केंद्रीय निरीक्षक नियुक्त केले आहे. केंद्रीय निवडणूक निरीक्षक उमेदवार, मतदार आणि निवडणूक यावर लक्ष ठेऊन आहेत. तसेच प्रत्येक मतदार संघात एक याप्रमाणे अकरा निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त असून त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रत्येक मतदार संघात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक केली आहे. ते निवडणूक कार्यांशी संबंधित सर्व बाबींवर बारकाईने नजर ठेऊन आहे. त्याचप्रमाणे निवडणूकीशी संबधित सर्व कामकाजासाठी जिल्ह्यात विविध 17 समित्या नेमल्या असून याकरीता 17 नोडल अधिकारी नेमण्यात आले आहे. निवडणूकीत उमेदवारांमार्फत होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक खर्च विभागाने आपल्या सर्व टीम परिपूर्ण साहित्यांसह तैनात ठेवल्या आहे. तसेच जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. एकंदरीत जळगाव जिल्हा प्रशासन निवडणुकीसाठी पूर्णपणे तयार झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात एकूण 34 लाख 47 हजार 184 मतदार असून यात स्त्री मतदातांची संख्या 16 लाख 50 हजार 741 इतकी आहे. चोपडा (अनुसूचित जमाती) मतदार संघात एकूण 3 लाख 7 हजार 760 मतदार आहेत. रावेर मध्ये 2 लाख 92 हजार 763 मतदार, भुसावळ (अनुसूचित जाती) मतदार संघात 3 लाख 7 हजार 5 मतदार, जळगाव शहर मतदार संघात 4 लाख 219 मतदार, जळगाव ग्रामीण मध्ये 3 लाख 14 हजार 604 मतदार, अमळनेर मध्ये 2 लाख 92 हजार 969 मतदार, एरंडोल मध्ये 2 लाख 79 हजार 339 मतदार, चाळीसगाव मध्ये 3 लाख 41 हजार 456 मतदार, पाचोरा मध्ये 3 लाख 12 962 मतदार, जामनेर मध्ये 3 लाख 8 हजार 468 मतदार तर मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात लाख 89 हजार 639 इतके मतदार आहेत. सन 2011 च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्यात स्त्री-पुरूष प्रमाण हे 924 होते. आजमितीस म्हणजे दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी हे प्रमाण 919 आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची संख्या 14 हजार 953 अशी आहे. तर सर्व्हिस वोटरची संख्या 7 हजार 870, अनिवासी भारतीय मतदारांची संख्या 36 इतकी आहे. दिव्यांग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी प्रशासनाने आयोगाच्या निर्देशप्रमाणे त्यांना ने-आण करणे, त्यांना व्हीलचेअरवरून मतदान कक्षापर्यंत घेऊन जाणे, आदि बाबींची पूर्ण तयारी ठेवली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 98.58 टक्के मतदारांना रंगीत छायाचित्र असलेल्या ओळखपत्राचे वाटप करण्यात आले आहे. सर्व्हिस वोटरला आपला मतदानाचा हक्क बजावता यावा याकीरता मतदाता सहाय्य केंद्र सुरु केले असून याठिकाणी या मतदारांकडून मतदानाचे फॉर्म भरुन घेण्यात येत आहे. तसेच सैनिक मतदारांना इटीपीबीएसद्वारे मतपत्रिका पाठविण्यात आल्या आहेत.

जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदार संघासाठी एकूण 2 हजार 107 ठिकाणी 3 हजार 532 मतदान केंद्रांची तर 54 सहाय्यकारी मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. मतदारांच्या सोयीसाठी व वेळेत मतदान पूर्ण होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर 900 ते 1400 मतदार मतदान करु शकणार आहे.

स्त्री सक्षमीकरणाचा एक उत्कृष्ट भाग म्हणजे सखी मतदान केंद्र. या मतदान केंद्रावर फक्त स्त्रियांची नियुक्ती केली जाते. जळगाव जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एका याप्रमाणे एकूण 11 मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आले. तर 11 मतदान केंद्रांचे बेवकास्टींग करण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात 36 मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. तर 11 मतदान केंद्रावर नेट कनेक्टीव्हीटी नसल्याने तेथे पोलीस दलातर्फे वॉकीटॉकीचा वापर करण्यात येणार आहे.

विधानसभा निवडणूका सुरळीत, शांततेत आणि निभर्यपणे पार पडण्यासाठी सर्व मतदान केंद्रावर 20 हजार 230 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस, केंद्रीय पोलीसांची 3 हजार 835 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उमेदवारांच्या खर्चांवर लक्ष ठेवण्यासाठी 66 स्थिर पाहणी पथके, 11 व्हिडिओ पाहणी पथके, 22 व्हिडिओ सर्व्हेक्षण पथके आणि 11 खर्च नियंत्रण टीम, 66 भरारी पथके तैनात आहे. तसेच मायक्रो ऑर्ब्झव्हर्सही नेमण्यात आले आहे. त्याचबरोबर निवडणूक लढविणा-या उमेदवारांच्या गावात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीकरिता मतपत्रिकेचा वापर होणार नाही. कारण मतपत्रिकेत चुकीचे मतदान आणि वेळखाऊपणा जास्त असतो. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन हे विश्वासार्ह आहे. आपले मत कोणाला गेले हे दर्शविण्यासाठी त्यास व्हीव्हीपॅट मशीनचा आधार आहेच. या मतदानाकरिता जळगाव जिल्ह्यात 4 हजार 321 कंट्रोल युनिट, 4 हजार 307 ईव्हीएम आणि 4 हजार 667 व्हीव्हीपॅटचा वापर केला जाणार आहे. तर मतदान यंत्र व कर्मचारी यांची वाहतुक करण्यासाठी 1411 वाहने तैनात करण्यात आली आहे. सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान यंत्र व मतदान कर्मचारी यांची सरमिळस करुन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. मतदान यंत्रे निवडणूक निरिक्षक व उमेदवार प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सिलींग व सेटींग करुन स्ट्रॉग रुममध्ये ठेवण्यात आली आहे. मतमोजणी विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यात 1254 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेतील सर्व कर्मचाऱ्यांना व मतदारांना प्रशासनातर्फे आयोगाच्या निर्देशाप्रमाणे मतदानाच्या ठिकाणी आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
मतदान आपला हक्क आहे. तो सर्वांनी बजावला पाहिजे. या निवडणुका भयमुक्त, नि:पक्षपणे आणि निर्भय वातावरणात व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व प्रकरेची तयार केली आहे. तेव्हा आता आपणही तयार रहा, आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी अर्थातच येत्या सोमवारी दिनांक 21 ऑक्टोंबर 2019 रोजी मतदान करायला.

– विलास बोडके,
जिल्हा माहिती अधिकारी, जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.