एकाच कुटुंबातील  ५ जणांनी सावकारी जाचामुळे  काढली किडनी विक्रीला!

0

नांदेड ;- एकाच कुटुंबातील ५ जणांनी सावकारांनी केलेल्या जाचामुळे किडनी विक्रीला काढली असून, याबाबतचे हस्तपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात लावण्यात आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुदखेड तालुक्यातील वाई येथील सत्यभामा बालाजी चुंचुलवाड या महिलेने हे हस्तपत्रक लावले असून, यासंदर्भात दै. ‘पुण्यनगरी’ ने त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपबीती कथन केलीआम्ही मुदखेड तालुक्यातील वाईचे रहिवासी आहोत. तिथे आम्ही शेती व शेतीपूरक कामे करून उपजीविका करत होतो. परंतु कोरोनापूर्वी अडचणींमुळे मुदखेड शहरातील नई आबादी भागातील तिघांकडून आम्ही पैशांची उचल केली होती. हे पैसे आम्ही संबंधितांना परतही केले,परंतु या तिघांनी अजून पैसे बाकी आहेत म्हणून आमच्या कुटुंबाला धमकावणे, मारहाण करणे असे प्रकार केले. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडे आम्ही अर्जही केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतरही स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे या तिन्ही सावकारांची दादागिरी वाढली असून, त्यांनी आमचा आणखी छळ केल्यामुळे आम्हाला गाव सोडावे लागले, अशी आपबीती सत्यभामाने सांगितली. यातून मार्ग काढून न्याय मिळावा म्हणून आम्ही ५ किडन्या विक्री करणे आहेत, असे
हस्तपत्रक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भिंतीवर चिकटवले आहे. मी, माझे पती बालाजी, दोन मुले व मुलगी अशा पाच जणांच्या किडन्या विकण्याची तयारी आम्ही केली आहे, असेही सत्यभामा यांनी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क केला असता हे हस्तपत्रक लावल्यापासून आम्ही लक्ष घातले आहे. संबंधित महिलेला आमच्या येथील महिला अधिकारी संपर्क करून चर्चा करत आहेत. परंतु ही महिला सध्या नांदेडबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.