पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात यश ; दोन महिलांना अटक

0

गडचिरोली : – गडचिरोली पोलिसांना अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथील कुंभारे कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात यश आले आहे. पाच जणांच्या मृत्यूप्रकरणी कुटुंबातीलच दोन महिलांना अटक करण्यात आली असून संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके अशी आरोपींची नावे आहेत. कुंभारे कुटुंबातील पाच जणांना या दोन महिला आरोपींनी विष देऊन शांत डोक्याने त्यांचा जीव घेतला असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

शंकर तिरुपती कुंभारे (५५, रा. महागाव (बु.) ता. अहेरी) यांचे गावात फर्निचरचे दुकान होते. पत्नी विजया कुंभारे (४९), मुलगा सागर (३२), रोशन (२९) व विवाहित मुलगी कोमल विनोद दहागावकर (३१) असे शंकर कुंभारे यांचे कुटुंब होते. यातील सागर हा दिल्ली येथे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. २२ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री जेवण केल्यानंतर विजया शंकर कुंभारे यांना अवस्थ वाटू लागल्याने पती शंकर कुंभारे यांनी त्यांना आलापल्ली येथील रुग्णालयात नेले. दरम्यान, काही वेळातच शंकर यांचीही प्रकृती अवस्थ वाटू लागली. त्यामुळे महागाव येथील राकेश मडावी या वाहनचालकाने विजया व शंकर या दोघांनाही रुग्णालयात नेले. मात्र, २६ सप्टेंबर रोजी शंकर कुंभारे यांचा मृत्यू झाला.

तर दुसऱ्या दिवशी २७ सप्टेंबर रोजी पत्नी विजयाच मृत्यू झाला. दोघांच्या अंत्ययात्रेला मुलगी कोमल दहागावकर, मोठा मुलगा सागर व विजया कुंभारे यांची बहीण आनंदा उराडे आले होते. परंतु पुढे या तिघांचीही प्रकृती खालावली. सोबतच मुलगा रोशन व वाहनचालक राकेश मडावी यालाही अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे सर्वजण रुग्णालयात भरती झाले. उपचार सुरू असताना मुलगी कोमलदहागावकर हिचा ८ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.

त्यानंतर १४ ऑक्टोबर रोजी आनंदा उराडे यांचाही मृत्यू झाला. तसेच लहान मुलगा रोशन कुंभारे याचा १५ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. एकामागून एक कुटुंबातील पाच सदस्य दगावल्याने अहेरी तालुक्यात विविध चर्चांना पेव फुटले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, अहेरीचे ठाणेदार मनोज काळबांडे व स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी व त्यांच्या तपास पथकास हा गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपवली. तपास यंत्रणेने तत्काळ वेगवेगळी चार तपास पथके गठित करून त्यांची परिसरातील गोपनीय यंत्रणा सक्रिय केली. गोपनीय सूत्रांकडून संघमित्रा कुंभारे व रोजा रामटेके यांचा गुन्ह्यात सक्रिय सहभाग असल्याची माहिती मिळाली. त्यांना १८ ऑक्टोबर २०२३ रोजी ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता, त्या दोघींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

संघमित्रा कुंभारे हिने रोशन कुंभारे याच्याशी तिच्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केले व या कारणामुळे तिच्या वडिलांनी आत्महत्या केली. तसेच याबाबत पती रोशन व सासरची मंडळी तिच्या माहेरच्या लोकांच्या नावे वारंवार टोमणे मारत असत. सहआरोपी रोजा रामटेके हिने तिच्या सासऱ्याच्या नावे असलेल्या शेतजमिनीत शंकर कुंभारे यांची पत्नी विजया कुंभारे व तिच्या इतर बहिणीचा हिस्सा मागून नेहमी वाद करत असल्याच्या कारणावरून त्या दोघींनी संपूर्ण कुंभारे कुटुंब व त्यांच्या नातलगांना विष देऊन जिवे मारण्याची योजना आखली. त्याप्रमाणे रोजा रामटेके हिने तेलंगणा राज्यात जाऊन विष आणले व ते विष जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा त्या दोघींनी मृतांच्या व आजारी व्यक्तींच्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये मिसळले. त्या विषाचा हळूहळू परिणाम होऊन त्या सर्व व्यक्ती एकापाठोपाठ आजारी पडण्यास सुरुवात झाली. यात पाच व्यक्तींचा मृत्यू झाला. राकेश मडावी हा शंकर कुंभारे यांच्या कुटुंबातील नव्हता, परंतु तो त्यांच्या वाहनातील पिण्याच्या पाण्याच्या बाटलीमधील पाणी प्यायल्याने विषबाधा होऊन तो आजारी पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.