जामनेर ! लोकशाही न्युज नेटवर्क –
शहरातील पाचोरा रोडवरील भारत पेट्रोलियम पंपासमोरील मोरया अर्थ मुव्हर्स व एक दुचाकी रीपेअरींगचे गॅरेज तसेच जेवणावळीचा विकास ढाबा सकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण खाक झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की दिनांक २२ रोजी सकाळी ६ वाजता अचानक मोरया अर्थ मुव्हर्स या दुकानाला आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीने जास्त पेट घेतला तर दुकानात जेसीबी वाहनाला लागणारे व इतर वाहनांचे सुटे भाग तसेच विविध कंपन्यांच्या ऑईलचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने इतरत्र सामान पुर्णपणे जळुन खाक झाला आहे. तसेच मोरया अर्थ मुव्हर्स या गॅरेजवर रीपेअरींगसाठी लावलेले वाहन देखील पुर्णपणे जळुन खाक झाले आहे. तर बाजुलाच असलेल्या गॅरेज देखील भक्ष्यस्थानी सापडले असुन गॅरेज मधील वस्तू यांचे मोठे नुकसान होऊन सामान व पार्ट जळालेले आहेत. त्याच प्रमाणे बाजुलाच असलेला जेवणावळीचा विकास ढाबा व ढाब्यातील सामान व फर्निचर संपूर्ण आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. सुदैवाने तिन्ही दुकानातील प्राणहानी टळली . या घटनेची माहिती मिळताच जामनेर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले. परंतु अग्निशमन दल येईपर्यंत तिनही दुकानांची राखरांगोळी झालेली होती. वेळेत आग विझविल्याने घटनास्थळापासुन बाजुला असणाऱ्या भंगार दुकान व एक वेल्डिंग दुकान वाचली आहेत. माहिती मिळताच नागरीकांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. हि आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आगीत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. या भिषण आगीत तीन दुकाने जळुन खाक झाल्याने दुकानदारांचे मोठे नुकसान होऊन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रीतसर पंचनामा करण्यात यावा अशी मागणी दुकानदारांनी केली आहे.