मोठी कारवाई ! गुटख्यासह १ कोटी १७ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अवैध गुटखा वाहतुकीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फैजपूर पोलिसांनी आज सर्वात मोठी कारवाई केली आहे. आमोदा गावाजवळील कुंदन हॉटेलजवळ कारवाई करून सुमारे ८३ लाखांचा दोन आयशर, मालवाहतूक वाहनांमध्ये भरलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच गेल्या १५ दिवसांपूर्वी फैजपुर पोलीस स्टेशन हद्दीत न्हावी गावातून सव्वा पाच लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला असल्याने फैजपूर परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात गुटख्याची अवैध तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी घबराट निर्माण झाली आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असल्याने प्रमुख सूत्रधार व्यवसायिकाचा शोध पोलीस करीत असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या १५ दिवसांपूर्वी न्हावी गावात सव्वा पाच लाखाचा गुटखा पान मसाला विकणाऱ्यावर कारवाई झाल्याने फैजपूर शहरातील व्यापारी वर्तुळासह न्हावी गावात मोठी खळबळ उडाली होती. गुटखा खाणाऱ्यांना ज्याप्रमाणे व्यसन लागले आहे त्याचप्रमाणे अवैध गुटखा आणि अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांना अवैध कमाईची लालूच मोठ्या प्रमाणात लागली आहे.  याच माध्यमातून फैजपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांना मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरकडून रावेर, सावदा, निंभोरा इत्यादी परिसरातून आपल्या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यातून फैजपूरकडून भुसावळ रोडवर आमोदा गावाजवळून गुटख्याची अवैध तस्करी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

या गुप्त माहितीनुसार, त्यांनी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी पहाटे तीन वाजता सापळा रचून आमोदा गावाजवळ हॉटेल कुंदनजवळ आयशर क्रमांक (एम. एच. 19 सी.वाय.9364 व एम.एच.19 सी.एक्स.0282) आल्यानंतर त्यांची तपासणी केली. त्यात गुटखा असल्याने दोन्ही वाहने पोलिस ठाण्यात आणली. पंचांसमक्ष वाहनाचा पंचनामा केल्यानंतर वाहनातून राज्यात प्रतिबंधीत असलेली 83 लाख सहा हजार 800 रुपये किंमतीचा गुटखा आणि आरोग्यास हानिकारक असा पान मसाला जप्त केला. तर 34 लाख रुपये किंमतीची दोन्ही वाहने मिळून असे  एकूण १ कोटी १७ लाख ६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ज्ञानेश्वर सुखलाल चौधरी (33 कोडगाव, ता.चाळीसगाव,ह.मु. शास्त्रीनगर,चाळीसगाव), जयेश सुभाष चांदलकर (33, रामेश्वर कॉलनी, जळगाव), राकेश अशोक सोनार (29, रामेश्वर कॉलनी,जळगाव) व मंगेश सुनील पाटील (31, रामनगर, एमआयडीसी, जळगाव) यांना अटक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे दोन्ही आयशर वाहनामागे टाटा हॅरीअर ही गाडी पोलिसांवर लक्ष ठेवून असल्याने या गाडीतील चालक मंगेश पाटील यास ताब्यात घेवून त्यालाही सहआरोपी करण्यात आले आहे. तर हा गुटखा आपला असल्याचा दावा पाटील यांनी केल्याचे समजते.

हवालदार विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपरपोलिस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ, पोलिस उपनिरीक्षक मैनूदीन सैय्यद, उपनिरीक्षक मोहन लोखंडे, हवालदार गोकुळ तायडे, हवालदार विकास सोनवणे, हवालदार उमेश चौधरी, सहाय्यक फौजदार देविदास सुरदास, चालक अरुण नमायते आदींच्या पथकाने केली.

यावल शहराचा आदर्श घ्यावा 

यावल शहरात अवैध गुटखा सुगंधित पान मसाला खाणारे ग्राहक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण अन्न व औषध प्रशासनातर्फे यावल शहरासह परिसरात पूर्व-पश्चिम उत्तर- दक्षिण भागात अवैध गुटखा विक्री वाहतूक संदर्भात एकही कारवाई होत नसल्याने याचा आदर्श जळगाव जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेने, अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांसह गुटखा खाणाऱ्यांनी घ्यायला पाहिजे. तसेच संपूर्ण यावल तालुक्यात पन्नीची बनावट आरोग्यास हानिकारक अशा दारू विक्रेते निर्माते यांच्यावर सुद्धा बेधडक कारवाई व्हायला पाहिजे असे सुद्धा यावल तालुक्यात बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.