साकळीचे ग्रामदैवत भवानी मातेचा आज यात्रोउत्सव

0

दोन दिवस बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम

गावात आनंदाचे वातावरण

मनवेल ता.यावल, लोकशाही न्युज नेटवर्क

अक्षय तृतीया निमित्त साकळी येथील ग्रामदैवत भवानी मातेच्या यात्रा उत्सवास आज दि.१० रोजी प्रारंभ होणार असून या उत्सवामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले असून उत्सव मोठ्या उत्साहात व धामधुमीत पार पडणार आहे. भवानी मातेच्या यात्रा उत्सवास शेकडो वर्षाची परंपरा लाभली आहे. यात्रा उत्सवानिमित्त परंपरेनुसार गावात दोन ठिकाणी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असतो.
हा यात्रा उत्सव ग्रामदैवत भवानी मातेच्या मंदिर परिसरात संपन्न होत असतो.

यात्रेनिमित्त मंदिराच्या गाभार्‍यापासून ते संपूर्ण मंदिर परिसर स्वच्छ केला जातो. त्यानंतर मंदिरात रंगीबेरंगी फुलांच्या माळा तसेच विद्युत रोषणाईची व ध्वज- पताकांनी, रांगोळ्यांनी सुंदर अशी सजावट केली जाते. यंदाही याचप्रकारे संपूर्ण मंदिराची सजवण्यात आलेला आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच दि.१० रोजी सकाळपासूनच देवीला महाअभिषेक होईल त्यानंतर यात्रा उत्सवानिमित्त जे-जे धार्मिक विधी आहे ते संपन्न होणार आहे. परंपरेनुसार विधीवत देवीची आराधना केली जाणार आहे.

अक्षय तृतीयेच्या यात्रा उत्सवा निमित्ताने गावात दरवर्षाप्रमाणे गाव परंपरेनुसार दोन ठिकाणी बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम होत असतो. त्यापैकी दि.१० रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी ग्रामदैवत भवानीमाता मंदिराच्या समोर भगत रमेश कृष्णा महेश्री हे बारागाड्या होणार आहे तर आखाजीच्या दुसऱ्या दिवशी दि.११ रोजी भगत हरदुल लाला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मनोज देवसिंग लोधी हे बारागाड्या होणार आहे. ह्या बारा गाड्या जि.प.मराठी शाळेच्या समोरच्या रस्त्यावर भागरता माय मंदिरापासून ओढल्या जातात. दोघी ठिकाणी वाजत- गाजत व पारंपारिक विधिवत तसेच भाविक भक्तांच्या उपस्थितीत तसेच सायंकाळच्या वेळी बारा गाड्या ओढल्या जात असतात.

हा उत्सव अतिशय नयनरम्य असतो. या उत्सवाच्या वेळी मंदिर परिसरात पूजा-अर्चा तसेच इतर वस्तू विक्रीची व खाद्यपदार्थांची दुकाने असतात.बारा गाड्या आल्या नंतर देवीच्या वहनांची गावात मिरवणूक काढली जाते. यात्रोत्सवास साकळी सह पंचक्रोशीतून भाविक – भक्त मोठ्या संख्येने येत असतात.

भवानी मातेची अख्यायिका

भवानी देवीच्या अवतरणासंबंधी जुनी अख्यायिका अशी की, फार वर्षापूर्वी भोनक नदीस महापूर आला होता या महापुरात देवीच्या मंदिरातील बाणा वाहून गेला होता.त्यावेळी तत्कालीन सरपंच स्व. आसाराम पाटील यांच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन सांगितले की, बारागाड्या यांच्या मदतीने नदीतील जमलेल्या गाळाची नागरटी कर ! त्याठिकाणी माझा बाणा सापडेल. त्यानुसार स्व.पाटील यांनी गावातील नागरिकांच्या मदतीने गाड्या जुंपून नागरटी करायला सुरुवात केली. तेव्हा पहिल्याच फाळ्यात देवीचा बाणा जमिनीच्या वर आला. नागरिकांनी वाजत- गाजत त्या बाण्याची विधीवत पूजा करून मंदिरात स्थापना केली. काही दिवसानंतर नेवेवाणी समाजाचे समाजभूषण स्व. पंडित उखर्डू वाणी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ जयपूर येथून भवानी मातेची संगमरवरी मूर्ती आणली त्यानंतर होम-हवन पूजा करून या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मंदिरात चैत्र उत्सव नवरात्र उत्सव हे मोठ्या उत्साहाने साजरे केले जात असतात. देवी भक्तांच्या जागृत व नवसाला पावणारी असल्याने दूर- दूरवरून भाविक-भक्त साकळी येथे भवानी मातेचे दर्शन येत असतात.

यात्रेनिमित्त चोख व्यवस्था

साकळी येथे दोन दिवस बारा गाड्यांचा कार्यक्रम होणार असल्याने बारागाड्या मार्गांची साफसफाई व इतर कामे ग्रामपंचायत प्रशासनाकडून केली जातात तर यात्राउत्सव दरम्यान पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येत असतो.तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक व लोकप्रतिनिधी यांचीही यात्रा उत्सवास वेळोवेळी पुरेपूर सहकार्य मिळत असते.

मंदिर परिसरात विकास कामे 

ग्रामदैवत भवानी मातेच्या कृपेने तसेच साकळी सह-पंचक्रोशीतील नागरिकांच्या सहकार्याने भवानी माता मंदिर परिसरात काही विकास कामे करण्यात आलेली आहे. यात लोकवर्गणीतून भव्य असे मंगल कार्यालय बांधण्यात आलेले असून त्या लगतचा परिसर विकसित केलेला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.