मोठा फटका ! गारपीटीसह पावसाची शक्यता

हवामान विभागाकडून अलर्ट

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सध्या वातावरण प्रचंड बदलले आहे.  गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र येत्या 15 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचं संकट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हवामान विभागाकडून आज राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. तर बीड, लातूर, धाराशिव, सांगली, परभणी आणि सोलापूरमध्ये वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच आज विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर लातूर, बीड, जालना, सोलापूर, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर आणि इतर अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

आज विदर्भ, मराठवाड्यासह खानदेशात जळगाव जिल्ह्यातही वादळी पावसाने हजेरी लावल्याने लिंबू, संत्रा, आंबा, केळी बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात पावसाने तीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. केळी, मका, गहू व अन्य पिकांची हानी झाली असून, जामनेर, बोदवड भागांत अधिकचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने पंचनामे सुरू केले आहेत. तीन हजार ४११ हेक्टरवर नुकसानीची माहिती प्रशासनाने दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.