पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र या भागावर तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात गेल्या 24 तासांत अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर येत्या बुधवारपर्यंत संपूर्ण राज्याला हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असला तरी त्याचा विदर्भात पावसाचा जोर जास्त असेल.
गेल्या आठ ते दहा दिवसांपासून बंगालच्या उपसागरात विविध ठिकाणी कमी दाबाचे पट्टे तयार होत आहेत. सिक्कीम ते मध्य महाराष्ट्र असा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस झाला.
यादिवशी मान्सून परतणार
पुणे वेधशाळेचे हवामान विभाग प्रमुख अनुपम कश्यपि यांनी दिलेल्या माहितीनुसार,सध्याचा पाऊस हा मान्सूनचाच असून, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम आहे. परतीचा पाऊस राजस्थानातून सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे तो महाराष्ट्रातून जाण्यास 5 ते 10 ऑक्टोबरचा कालावधी उजाडेल.
या भागात यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या कालावधीत राज्यातील काही भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ : यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला, मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, मध्य महाराष्ट्र : पुणे, सातारा, सोलापूर,उत्तर महाराष्ट्र : नाशिक, जळगाव, कोकण : रत्नागिरी, रायगड, ठाणे.