राज्यात अवकाळी पावसाचं संकट, खान्देशासह ‘या’ जिल्ह्यांना इशारा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट निर्माण झालं असून  पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये विदर्भात ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील, असं भारतीय हवामान खात्याने सांगितलं आहे.

राज्याच्या अनेक भागात काही दिवसांपुर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. अशातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या वायव्य राजस्थानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे उत्तरेतील राज्यात मुसळधार पावसासह गारपीट होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार,  १६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खान्देशात देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने विदर्भाला विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. मुंबई, पुणे सोलापूर, मालेगाव, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० डिग्री सेल्सिअसच्या जवळ आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.