.. तर रावेरलाही नणंद-भावजय लढत; गुलाबराव पाटलांचे मोठे वक्तव्य

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. त्यात पार्श्वभूमीवर काल भाजपकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यात महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली. यात जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान रक्षा खडसे यांना उमेदवारी घोषित होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांच्या समोर सासरे एकनाथ खडसे  यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली. या पार्श्वभूमीवर काल बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु एकनाथ खडसे यांनी तब्येत ठीक नसल्याचे म्हटले. डॉक्टरांनी परवानगी दिली तर निवडणूक लढवणार. त्यामुळे एकनाथ खडसे यांची कन्या आणि रक्षा खडसे यांच्या भावजय रोहिणी खडसे यांना उमदेवारी देण्यात यावी, अशी मागणी बैठकीत झाली होती. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून नक्की कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 नणंद-भावजय सामना

जळगाव जिल्ह्यातील बांभोरी गावात विविध विकास कामांच्या शुभारंभाप्रसंगी यावर गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, भाजपाने त्यांची उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. महायुती म्हणून ते जे उमेदवार देतील त्याचा आम्ही प्रचार करणार आहोत. रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे किंवा रोहिणी खडसे यांच्या नावाच्या चर्चा आहेत. रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळाली तर बारामतीप्रमाणे रावेरमध्येही नणंद-भावजय असा सामना पाहायला  मिळणार.

तसेच जयंत पाटील हे महायुतीत आले असते तर ते नक्कीच मंत्री राहिले असते. आता त्यांच्या लक्षात आले असेल की, आपण चूक केली आहे, असा टोला गुलाबराव पाटलांनी जयंत पाटलांना लगावला. मनसे, शिवसेना आणि भाजप एकाच विचार धारेचे पक्ष आहेत. त्यामुळे बैठकीत चर्चा झाली असेल तर ते लवकरच बाहेर येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.