मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शहांनी मुख्यमंत्रीपदाचा शब्द पाळला नाही -उद्धव ठाकरे

0

यवतमाळ ;- अनेकांना मुख्यमंत्री बनण्याची हौस आहे. मात्र, सत्तेच्या या साठमारीत सामान्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांना काय मिळणार आहे? शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. त्या रोखण्यासाठी काही पाऊले उचलणार आहात की नाही? मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शहांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. मात्र, नंतर तो शब्द त्यांनी पाळला नाही. आम्हाला युतीच्या बाहेर ढकलले. तेव्हाच तो शब्द पाळला असता तर भाजपच्या कार्यकर्त्यांना आता इतरांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या. भाजपने आता आपल्यासोबत आलेल्या बाजारबुणग्यांना सांभाळावे, एवढेच काम भाजपला राहीले आहे.अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केली.

पोहरादेवीच्या दर्शनाआधी यवतमाळ येथे उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवातही झाली असून त्यांनी कालच येवला येथून रणशिंग फुंकले. तर, आजपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा देखील महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे.. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या अनेक दिवसांपासून पोहरादेवीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. मागे मविआच्या ज्या काही सभा झाल्या, त्यादरम्यानही येथे सभा झाली नाही. त्यामुळे आज पोहरादेवीला आलो आहे.

अजित पवार यांच्या बंडावरुन उद्धव ठाकरे म्हणाले, पूर्वी पक्ष फोडला जायचा, आता पक्ष पळवला जातोय. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेला हे पटलेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या बंडानंतर अनेक जण मला सांगत आहे की, उद्धवजी आम्ही तुमच्यासोबत आहे. पक्ष पळवण्यावर मला एवढे सांगायचे आहे की, तुम्ही पीक नेऊ शकता मात्र शेती आमच्याकडेच आहे. आणि जे पीक तुम्ही पळवून नेले त्याला हमीभाव भेटतो का ते आता पहा, असा टोलाही मंत्रिपदांवरून त्यांनी शिंदे गटाला लगावला. तसेच, कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे, हे समजून घेण्यासाठी मी महाराष्ट्र दौऱ्यावर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.